scorecardresearch

कल्याण : विदेशी चलानातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारी टोळी अटकेत; कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांची कारवाई

अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका परप्रांतामधील एका टोळीला कल्याण मधील कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण : विदेशी चलानातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारी टोळी अटकेत; कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांची कारवाई
सौदी अरेबियाचे रियाल चलन (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सौदी अरेबियाचे रियाल चलनमध्ये गुंतवणूक करा. आम्ही तुम्हाला अल्पावधीत दुप्पट रक्कम करुन देतो, असे सांगून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका परप्रांतामधील एका टोळीला कल्याण मधील कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत एका महिलेचा समावेश आहे.

इशाख शरफ शेख (४०, रा. नेवाळीपाडा, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, मुळगाव – दिहात अशोक विहार लोणी, जि. गाविजाबाद, उत्तरप्रदेश), सोफीकुल लोन शेख (४२, रा. हेदसन गेट ता. कल्याण जि. ठाणे, मुळगाव – जॉयनगर, पो. हरनगर, थाना- नाकाशीपाडा, जि. नोदीया, पश्चिम बंगाल), इम्रान मोहम्मद इक्बाल खान बस (३०, रा. हेदूटने ता. कल्याण, जि. ठाणे. मुळगाव – बदरपुर, जियातपुर, मोडबन, पश्चिम-दिल्ली) आणि हमीदाबीबी जाफरअली गाजी (४८, रा. नेवाळी ता. अंबरनाथ जि. ठाणे, मुळगाव – बैसनबतलापाडा, बिठारी उत्तर २४ परगना, पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : ९९ लाख रुपयांचे कापड चोरले, परंतु पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांवरील स्टिकरमुळे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

ठाण्यातील राबोडी परिसरातील रहिवासी अजीम इस्माईल कर्वेकर (५५) रिक्षा व्यावसायिक आहेत. कळवा भागात ते व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिक्षात एक महिला प्रवासी बसली. तिने अजीम यांच्याशी ओळख वाढवली. त्या महिलेने काही दिवसांत अजीम यांचा विश्वास संपादन केला. चर्चेदरम्यान तिने सांगितले, मी अशा लोकांना ओळखते जे पैसे दुप्पट करून देतात. अजीम यांच्या मुलीचे लग्न होते. त्यांना पैशांची गरज होती. ते या अमिषाला बळी पडले. त्या महिलेने आपल्या साथीदारांना अजीम यांची भेट घालून दिली. या भेटीदरम्यान चौघांनी अजीम यांना सौदी रियालचे चलन दिले. हे चलन बाजारात वटवल्यानंतर अजीम यांना पैसे मिळाले. त्यावर विश्वास बसल्याने अजीम यांनी १ लाख ८० हजार रुपये या चौघांना देण्याचे ठरवले. त्यानुसार या चौघांनी त्यांना आणखी रियाल चलन घेण्यासाठी कोळसेवाडी परिसरात बोलावले. अजीम यांच्याकडून 1 लाख ८० हजार रुपये घेऊन त्यांच्या हातात रियाल चलन असल्याचे सांगत रुमालात बांधलेले एक गाठोड दिले. त्यानंतर चारही आरोपी तेथून पसार झाले. काही वेळाने अजीम यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यांना त्यात सौदी रियाल ऐवजी कागदाचे बंडल आढळून आले. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर अजीम यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, दिनकर पगारे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपींचा माग काढला. आरोपींना अटक केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 22:57 IST

संबंधित बातम्या