कल्याण – कल्याण शीळ रस्त्यावरील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांबरोबर या रस्ते भागातील गावांमधील नागरिक त्रस्त आहेत. शीळ रस्ते बाधितांना मंजूर ३०७ कोटीची भरपाई देण्यास शासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शीळ रस्त्याचे काही भागातील रूंदीकरण, काँक्रिटीकरण रखडले आहे. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी, शासनाचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कल्याण शीळ रस्त्यावर आंगण ढाबा परिसरात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव संंपल्यानंतर सर्व पक्षीय युवा मोर्चाचे मुख्य संघटक, काटईचे ग्रामस्थ गजानन जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत उपोषण केले जाणार आहे. तीन वर्षापूर्वी याच संघटनेने शीळ रस्ते बाधितांना भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी ५१ दिवसांचे बेमुदत उपोषण केले होते.
कल्याण शीळ रस्त्याचे रूंदीकरण, काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर मागील तीन वर्षापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी सुसाट झाला होता. काटई नाका ते खिडकाळी, देसाई गावापर्यंत रस्ते बाधितांनी भरपाई न मिळाल्याने शीळ रस्त्यास जमिनी देण्यास एमएसआरडीसीला विरोध केला आहे. दीड वर्षापासून शीळ रस्त्यावर मेट्रो मार्गाची कामे सुरू झाली. हा रस्ता पुन्हा वाहतूक कोंडीत अडकला. शीळ रस्त्यालगतच्या गावांमधील नोकरदार, शाळकरी विद्यार्थी, व्यावसायिक यांना दररोज शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मनसेचे नेते राजू पाटील यांनी शीळ रस्त्याचा रखडलेला भाग पूर्ण होण्यासाठी रस्ते बाधितांना शासनाने लवकर भरपाई द्यावी म्हणजे हा रस्ता रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणासाठी मोकळा होईल असे अनेक वेळा पत्रव्यवहाराने शासनाला कळवले.
दोन वर्षाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी शीळ रस्ते बाधितांना भरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या काळात शिंदे पिता-पुत्रांनी शीळ रस्ते बाधितांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. निवडणुका संपल्या आणि रस्ते बाधितांना शिंदे पिता-पुत्रांकडून नाहीच, पण शासन अधिकारीही उभे करेनाशे झाले. शीळ रस्ते बाधितांचा हिरमोड झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीणचा भाग असलेल्या २७ गाव भागातून खासदार डाॅ. शिंदे यांना सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी ग्रामस्थांनी जोरदार प्रयत्न केले. खासदार झाल्यानंतर आपणास लवकर भरपाई मिळेल या अपेक्षेवर शीळ रस्ते बाधित होते. त्यांचा हिरमोड झाला. आपण आता शासन दरबारी बेदखल आहोत, याची जाणीव झाल्याने सर्व पक्षीय युवा मोर्चाने भरपाई आणि शीळ रस्त्यावरील कोंडीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील कोंडीमुळे प्रवाशांबरोबर या रस्त्यालगतच्या गावांमधील नागरिक त्रस्त आहेत. रस्ते बाधितांना भरपाई देण्यात येत नसल्याने काटई ते देसाई परिसरातील रुंदीकरण, काँक्रिटीकरण रखडले आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही पुन्हा बेमुदत उपोषण करत आहोत.- गजानन पाटीलमुख्य संघटक,सर्व पक्षीय युवा मोर्चा.