कल्याण : टिटवाळ्या जवळील काळू नदी परिसरात फिरण्यासाठी आलेले तीन जण मंगळवारी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी काळू नदीत उतरले. खोल पाण्याचा आणि पाण्याच्या वाढत्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे तिघे जण वाहून गेले. ते काळू नदीवरील टिटवाळा भागातील एका लहान पुलाखाली अडकले. ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून या तिन्ही तरूणांना वाचविण्यात यश आले.
हे तिन्ही तरूण तगडे असल्याने पुलाच्या भिंतीमधून बाहेर आलेल्या एका झाडाची लहान फांदी, या भागात लटकत असलेल्या दोरीला धरून होते. मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढत होता. या तरूणांना पोहता येत असले तरी त्यांना वेगवान पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून आले होते. ते बचावासाठी धावा करत होते.
काळू नदीवरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना पुलाखाली पाण्यात तरूण अडकल्याचे ग्रामस्थांना समजले. ही माहिती त्यांनी टिटवाळा भागातील ग्रामस्थांना दिली. या भागात भातशेतीची कामे सुरू आहेत. शेतावरील शेतकरी तरूण अडकलेल्या भागात जमा झाले. काही गुराखी तेथे आले. पण त्यांच्याकडे तरूणांना बचावासाठी काही नव्हते.
हे तिन्ही तरूण एकमेकांना आधार देत पुलाखालील पाण्यात तरंगत होते. या तरूणांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान ग्रामस्थांसमोर होते. ही माहिती गुरवली पाडा येथील मच्छिमार मिलिंद एकनाथ दळवी, सुनील जाधव आणि पाड्यातील ग्रामस्थांना समजली. त्यांनी तात्काळ दोरखंड आणि तरूणांना बाहेर काढण्याचे आवश्यक सामग्री घेतली. आणि काळू नदीच्या लहान पुलाकडे धाव घेतली. तिन्ही तरूणांचे वजन प्रत्येकी ५५ ते ६० किलोच्यापुढे होते. त्यामुळे त्यांना दोरखंडाने वर खेचण्याचे आव्हान होते.
मिलिंद दळवी, सुनील जाधव आणि इतर ग्रामस्थांनी जाड दोर पाण्यात सोडला. पुलावरती आठ ते दहा जणांनी दोर पकडून ठेवला. दोर पाण्यात येताच एका पाठोपाठ एक तरूणांना वर खेचण्यात ग्रामस्थांना यश आले. शेवटी राहिलेल्या एका तरूणाला वर काढताना मात्र ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागली. हा तरूण दोरखंडाला पकडून वर येत असताना त्याच्या वजनामुळे त्याचे ओले हात दोरखंडावरून सटकत होते. त्यामुळे तो सतत पाण्याकडे खेचला जात होता. चार ते पाच वेळा प्रयत्न करूनही शेवटचा तरूण वर आणण्यात ग्रामस्थांंना यश येत नव्हते. अखेर दोरखंडाला वेट्टोळ्या गाठी मारून दोर पाण्यात सोडण्यात आला. त्या गाठींना पकडून शेवटचा तरूण नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. हे तिन्ही या भागात फिरण्यासाठी आले होते.