कल्याण : कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकाजवळील सहजानंद चौकात सहा रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांमुळे हा रस्ता सतत वाहनांनी गजबजलेला असतो. या सततच्या वाहन वर्दळीमुळे या भागात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहतूक विभागाने येणाऱ्या तीस दिवसात सहजानंद चौकातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा वाहतूक बदल यशस्वी झाला. याविषयी नागरिकांच्या हरकती सूचना ऐकून घेऊन हा प्रायोगिक तत्वावरील बदल वाहतूक विभागाकडून कायमस्वरूपी केला जाणार आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जुलै १९९६ च्या मोटार वाहन कायदा कलमाचा वापर करून या वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसर, शिवाजी चौक, सहजानंद चौक, मुरबाड रस्त्यावरील रामबाग गल्ली भागात सतत वाहतूक कोंडीने गजबजेला असतो. या सततच्या कोंडीने शहर परिसरातील नागरिक, माल वाहतूकदार, व्यापारी त्रस्त आहेत. गेल्या आठवड्यात माजी आमदार प्रकाश भोईर यांनी वाहतूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन कल्याण मधील दररोजच्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
वाहतूक बदल
कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकाकडून संतोषी माता रस्तामार्गे रामबाग गल्ली भागात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहजानंद चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सहजानंद चौक येथून मकबरा चौक यथून मकबरा रस्त्याने जाऊन साती आसरा येथे वळण घेऊन संतोषी माता चौक येथे जातील. चिकनघर येथून काळा तलावमार्गे सहजानंद चौककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साती आसरा मकबरा चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने साती आसरा येथून मकबरा चौक येथे डावे वळण घेऊन संतोषी माता चौकातून इच्छित स्थळी जातील.
एकदिशा मार्ग
संतोषी माता चौक कल्याण पोळी भाजी केंद्र ते सहजानंद चौकापर्यंतचा मार्ग हा रामबागकडून संतोषी माता रस्त्यानेे सहजानंद चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एकदिशा मार्ग म्हणून वापरता येईल. या वाहतूक अधिसूचनेची वाहन चालकांनी प्रभावी अंमलबजावणी केली तर सहजानंद चौक भागात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. वाहतूक विभागाने या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी कल्याणमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या अधिसूचनेबाबत नागरिकांच्या काही सूचना, हरकती असतील त्यांनी ठाणे वाहतूक पोलीस आयुक्त यांच्या तीन हात नाका, ठाणे येथील कार्यालयात तीस दिवसाच्या कालावधीत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या मार्ग बदलातून वगळण्यात आले आहे.