कल्याण : पाऊस, खड्डे आणि धिम्या गतीने धावत असलेली वाहने यामुळे गुरूवारी दुपारपासून कल्याण शहर वाहन कोंडीत अडकत गेले आणि संध्याकाळी शहराचे वर्दळीचे, अंतर्गत रस्ते कोंडीने जाम झाले. या कोंडीत दोन दिवसांनंतर कामावर गेलेला नोकरदार आणि त्यांच्यासह शाळेचे विद्यार्थी अडकून पडले. वाहनांच्या लांब रांगा, कर्णकर्कश भोंग्यांनी रस्तोरस्ती गजबजाट होता. कल्याणमधून प्रेम ऑटो भागातून उल्हासनगर, शहाड येथे जाण्यासाठी प्रवाशांना दोन तासाचा कालावधी लागत होता.

कल्याण शहराची या कोंडीतून सुटका होईल कधी, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. पालिका, वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकाऱ्यांनी या कोंडीवर उपाय करण्यासाठी फक्त वेळोवेळी बैठका घेतल्या. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या कोंडीत कल्याण शहरातील नागरिक, व्यापारी सर्वाधिक अडकून पडत आहेत. अनेकजण या सततच्या कोंडीला कंटाळुन आपला व्यवसाय अन्य शहरात करण्याचा विचार करत आहेत.

गुरुवारी दुपारपासून शहाड उड्डाण पूल, वालधुनी, प्रेमऑटो, मुरबाड रस्ता, संतोषी माता रस्ता भागात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मोटार, दुचाकी चालकांनी अंतर्गत रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अगोदरच शहरातील मुख्य रस्ते वाहनांनी जाम होते. त्यात अंंतर्गत अरूंद रस्त्यावर वाहने आल्याने शहरातील रस्ते कोंडीत अडकले.

या कोंडीत शाळेच्या बस अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिक, व्यापारी कल्याण शहरात येत आहेत. त्यांना कोंडीचा फटका बसला. गणेशोत्सव तोंडावर आला आहे. तत्पूर्वी या कोंडीवर उपाययोजना करण्याऐवजी पालिका प्रशासनातील अधिकारी दालनातील दिवसभराच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याची टीका होत आहे. वाहनांच्या तुलनेत वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक पुरेशा प्रमाणात नाहीत. अलीकडे नव्याने भरती केलेले नवतरूण वाहतूक सेवक वाहतूक नियोजनाचा अनुभव नसल्याने चौक, रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून वाहतूक कोंडी होईपर्यंत आपल्या व्हाॅट्सपमध्ये मग्न असतात.

प्रेम ऑटो चौकातून शहाड, उल्हासनगर या दहा मिनिटाच्या प्रवासाठी दोन तासाचा अवधी लागत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. शहाड परिसर कोंडीत अडकल्याने उल्हासनगर शहरातील कोंडीवर त्याचा परिणाम झाला आहे. रामबाग, सहजानंद चौक, लालचौकी, चिकणघर, वालधुनी पूल, बिर्ला महाविद्यालय परिसर, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, अहिल्याबाई चौक, शिवाजी चौक, शंकरराव चौक, बाजारपेठ, रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्ते वाहन कोंडीने गजबजून गेले आहेत. कल्याण शहरातील मेट्रोची कामे संथगतीने सुरू आहेत. याविषयी कोणीही आवाज उठवित नाही. बोलेल त्याला राजकीय कानपिचक्या दिल्या जात आहेत.

पर्यावरणस्नेही उपक्रमासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने वाहन कोंडीमुळे ध्वनी, हवेतील प्रदूषण होत आहे याची जाणीव ठेऊन शहरातील वाहतूक कोंडी सोडविणे हे आपलेही काम हा विचार करून वाहतूक विभाग, आरटीओ यांना विचारात घेऊन गणेशोत्सवापूर्वी शहरातील वाहतूक सुस्थितीत होईल याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.