कल्याण – कल्याण पश्चिम कर्णिक रोड परिसराचा वीज पुरवठा मंगळवारी (ता. २२) महावितरणकडून सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. महावितरणच्या तेजश्री उपकेंद्रात वीज वाहिका देखभाल दुरूस्तीचे काम या वेळेत केले जाणार आहे, असे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी जाहीर केले आहे.
कल्याण मधील महावितरणच्या २२ केव्ही तेजश्री उपक्रेंद्रातून कर्णिक रोड परिसराला विद्युत पुरवठा करणाऱ्या २२ केव्ही कर्णिक रोड वाहिनीवर महावितरणकडून देखभाल दुरूस्तीचे काम मंगळवारी केले जाणार आहे. तसेच, या भागातील आरडीएसएस योजनेंतर्गत कंडक्टर बदलीचे काम या वीज बंद कालावधीत केले जाणार आहे. त्यामुळे या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कर्णिक रस्ता भागातील वीज पुरवठा मंगळवारी पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे.
२२ केव्ही वीज वाहिनीवरून तेजश्री उपकेंद्रातून वीज पुरवठा होत असलेल्या कर्णिक रोड भागातील रामबाग गल्ली क्रमांक एक, दोन, तीन, आणि चार परिसर, संतोषीमाता रस्ता, भारत भोईर पार्क, गणेश टाॅवर, अनंत रिजन्सी, भुजबळवाडी, निलतेज नगर, त्रिभुवन सोसायटी, मेगा डेव्हलपर, अंबर वडापाव चौक, गणपती मंदिर, गुरूद्वारा रोड, मधुरिमा स्वीट्स, यशवंतराव चव्हाण उद्यान, ठाणगेवाडी, सेंट थाॅमस स्कूल, हिंदी शाळा, नूतन विद्यालय परिसरात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांना पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला तर घरातून कार्यालयीन काम करणारे नोकरदार, शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, कार्पोरेट कार्यालय, बँका, खासगी वित्तीय संस्था, खासगी शिकवणी वर्ग, संगणकीकृत कामे करणारी दस्त नोंदणीकृत सरकारी कार्यालये यांना वीज पुरवठा बंद होण्याच्या काळात कोणताही त्रास होऊ नये. त्यांनी वीज पुरवठा बंद वेळेत काही पर्यायी तजविज करावी या उद्देशातून महावितरणने नागरिकांना पूर्वसूचना केली आहे. अचानक वीज पुरवठा खंडित झाला की नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. विविध प्रकारे रोष व्यक्त केला जातो. हे प्रकार पूर्वसूचना देऊन महावितरणने टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या आठवड्यापासून कल्याण पूर्व, डोंबिवली शहराचा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. पडघा येथील मनोरा मार्गाने मानपाडा-पाल येथे विद्युत पुरवठा वाहिकेत काही तांत्रिक बिघाड झाल्याने हा पुरवठा खंडित होत असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात कल्याण पश्चिमेचा वीज पुरवठा मंगळवारी देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.