कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या आगामी महापालिकांसाठी तयार करण्यात आलेल्या १२२ प्रभागांंच्या प्रारूप प्रभाग रचनांवर गुरूवारी पालिका मुख्यालयात सुनावणी झाली. या सुनावणीच्यावेळी चार सदस्यीय ३१ प्रभागांमधील माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवकांनी विविध प्रकारच्या हरकती घेतल्या. सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो २७ गाव हद्दीतून दाखल झालेल्या तीन हजार ४६२ हरकतींचा विषय.

२७ गावांमधील ग्रामस्थांना कल्याण डोंबिवली पालिकेत राहायचे नाही. त्यामुळे २७ गावे प्रारूप प्रभाग रचनेतून वगळा आणि नव्याने प्रभागांची रचना करा. २७ गावांना पालिकेत राहायचे नाही, अशी मागणी २७ गावे आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, प्रदेश काँग्रेस नेते संतोष केणे, अर्जुनबुवा चौधरी यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे केली.

प्राधिकृत अधिकारी आणि राज्याचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह, आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत प्रभाग रचनांंवर सुनावणी घेण्यात आली. बहुतांशी हरकतदारांनी प्रभागाची बदललेली रचना, लोकसंख्या आणि प्रभाग, हद्दीचे वाद असे विषय उपस्थित केले. पालिकेत एकूण २६५ हरकती आणि सूचना दाखल झाल्या होत्या. त्याच बरोबर २७ गाव हद्दीतून सर्व पक्षीय ग्रामीण संघर्ष समितीच्या माध्यमातून याविषयावर तीन हजार ६४२ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.

पालिकेने मागील तीस वर्षात २७ गावांसाठी काही केले नाही. विकास कामांपासून गावे दूर राहिली. गावातील नागरी समस्या कायम आहेत. २७ गावचे ग्रामस्थ पालिकेत राहण्यास इच्छुक नाहीत. गावांचा विरोध असताना गावांमध्ये प्रारूप प्रभाग रचना केली कशी. या हरकतींच्या माध्यमातून आम्ही न्यायालयात आव्हान देऊ. पालिकेने प्रभाग रचना बदलली नाही तर त्याचे दुष्परिणाम पालिका अधिकाऱ्यांसह संबंंधिताना भोगावे लागतील, असे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

२७ गावांना पालिकेने नेहमीच सापत्न भावाची वागणूक दिली. या गावांंना विकासपासून दूर ठेवले. गावांची प्रारूप प्रभाग रचना वगळून नवीन रचना पालिकेने करावी, अशी सूचना खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी केली. पालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून पहिला प्रभाग हा मांडा टिटवाळा येथून सुरूवात झाले. यासंदर्भात शासनाचे अध्यादेश आहेत. असे असताना अलीकडे मधल्याच भागातून प्रभाग रचना कशी तयार करण्यात आली, असे प्रश्न माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केले. महाराष्ट्र महापालिका कायद्याप्रमाणे १२ ते १५ लाख लोकसंख्येसाठी १२६ प्रभाग आहेत. मग प्रभाग रचना १२२ का कायम ठेवण्यात आली, असा प्रश्न वास्तुविशारद संदीप पाटील यांनी हरकतीद्वारे उपस्थित केला. सुनावणी प्रमुख आणि आयुक्तांनी २७ गावांसंदर्भात झालेली चूक कबुल करून यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळविले जाईल, असे हरकतदारांना सांगितले.

२७ गावांना पालिकेत राहायचे नाही तरी गावांची प्रभाग रचना तयार करण्यात आली. गावांची अनेक वर्षापासून महापालिकेची मागणी आहे. ती शासनाने आता मान्य करावी. हरकतीच्या माध्यमातून आम्ही न्यायालयात दाद मागणारच आहोत. – दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट.