कल्याण : कल्याणमधील कृत्रिम बुध्दिमता क्षेत्रातील विशेषज्ञ आणि एका कार्पोरेट कंपनीतील वरिष्ठ अधिकारी कासम शेख यांनी चौथ्यांदा मायक्रोसाॅफ्ट कंपनीतर्फे कृत्रिम बुध्दिमता क्षेत्रात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट विशेषज्ञ पुरस्कार पटकावला आहे. सलग चौथ्यांदा अशाप्रकारचा पुरस्कार पटकावणारे कासम शेख हे महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव विशेषज्ञ आहेत.

मायक्रोसाॅफ्ट ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशन्ल्स’ म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. कॅपजेमिनी इंडिया या विदेशी नामवंत कार्पोरेट कंपनीत कासम शेख वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. मुळचे कल्याणमधील रहिवासी असलेले कासम शेख हे सामान्य कुटुंबातील आहेत. कल्याणमधील भोईरवाडी भागातील वाणी विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. बि. के. बिर्ला महाविद्यालयातून त्यांनी संगणक विज्ञानाची पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली.

मागील सोळा वर्षापासून आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सक्रिय आहोत. कृत्रिम बुध्दिमत्तेबद्दल सामान्यातल्या सामान्य माणसाला चांगली माहिती घरबसल्या मिळावी. त्याच्या कृत्रिम बुध्दिमत्तेबद्दल असलेल्या शंका दूर व्हाव्यात आणि या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या पीढीला कृत्रिम बुध्दिमत्तेबद्दल माहिती मिळावी म्हणून आपण कृत्रिम बुध्दिमत्तेबद्दलच्या ॲझुअर तंत्रज्ञानातून शेकडोनी दृश्यध्वनी चित्रफिती समाज माध्यमांत सामायिक केल्या आहेत.

एआय तंत्रज्ञानावर आधारित आपण पाचाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ही सर्व पुस्तके आपण ऑनलाईन माध्यमातून गरजूंना निशुल्क उपलब्ध करून दिली आहेत, असे विशेषज्ञ कासम यांनी सांगितले.

येणारे विश्व हे कृत्रिम बुध्दिमत्तेचे असणार आहे. त्यामुळे नवीन तरूण पीढीने हे तंत्रज्ञान अधिकाधिक आत्मसात करावे यासाठी आपले प्रयत्न असतात. मायक्रोसाॅफ्टने कृत्रिम बुध्दिमत्तेमधील चांगले तंत्रज्ञान वेचून जगासमोर आणले आहे. आतापर्यंत हे तंत्रज्ञान कसे विध्वंसक आहे असाच त्याचा प्रचार केला जात होता. या तंत्रज्ञाची विधायक बाजूही जगासमोर आल्याने जग या तंत्रज्ञानाच्या मागे आता धावत आहे, असे शेख यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तंत्रज्ञानाची येणाऱ्या काळातील गरज ओळखून अनेक विद्यापीठांनी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचे स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत. नवतरूण पीढी आता या क्षेत्राकडे अधिक प्रमाणात वळू लागली आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे महासागर आहे. नवनवे या तंत्रज्ञानातून बाहेर येत आहे. ते प्रत्येकाने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे कासम शेख सांगतात. कृत्रिम बुध्दिमत्तेमधील कासम शेख यांची विशेषज्ञता ऐकून महाराष्ट्र शासनातील काही विभागांनी त्यांच्याशी यापूर्वी मार्गदर्शनासाठी संपर्क साधला होता.