कौस्तुभ सावरकर चित्रपट लेखक
वाचन हे आपल्याला जगाकडे एक व्यापक दृष्टीने पहायला शिकवते. पुस्तक वाचनामुळे एखाद्या गोष्टीचे विविध कंगोरे समजण्यास मदत होते. वाचनामुळे आपल्याला विविध तज्ज्ञांची मते कळतात आणि त्या मतांवरून आपल्याला आपले स्वतंत्र मत तयार करता येते. त्या मतांवरून आपण कसे आहोत, आपली विचारसरणी कशी आहे, याचे परीक्षण करता येते. या वाचन परीक्षणामुळेच आपल्याला आपली स्वतंत्र विचारसरणी विकसित करता येते. माझ्या वाचनाची सुरुवात इयत्ता तिसरीतील इतिहासाच्या पुस्तकांपासून झाली. इतिहासाच्या पुस्तकातील शिवाजी महाराजांचा इतिहास मला खूप आवडत असे. लहानपणी शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून सुरू झालेला हा वाचनाचा प्रवास अजूनही अखंडपणे सुरू आहे.
तिसरीतील इतिहासाच्या पुस्तकाबरोबरच लहानपणी दर दिवाळीला येणाऱ्या ‘किशोर’ या बाल मासिकाचीही मला खूप ओढ लागलेली असायची. किशोरमुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. त्या किशोर वयात मी पु.ल.देशपांडे यांचे साहित्य , विं.दा.करंदीकर , शांता शेळके यांच्या कविता आवडीने वाचल्या. त्यामुळेच पाचवीपासून मी कविताही करायला सुरूवात केली. गिरगावातील जवाहर बालभवन या संस्थेच्या प्रमुख प्रतिभा थरवळ यांनी मराठी साहित्यविश्वाशी माझी ओळख करून दिली. शाळेमधील वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यामुळेही विविध प्रकारची पुस्तके माझ्या वाचनात आली. बालपणी अविष्कार या नाटय़संस्थेच्या शिबिरांमुळे मला नाटक वाचनाची आवड निर्माण झाली. नाटकाचा अभ्यास आणि वाचन प्रेम यामुळे मी पु.ल.देशपांडे यांची बटाटयाची चाळ, व्यक्ती आणि वल्ली अशी सगळी पुस्तके, राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला, कृष्णाजी खाडिलकर यांचे मानापमान, कीचकवध, गोविंद बल्लाळ देवल यांचे संशयकल्लोळ, भाऊबंदकी ही नाटकेसुद्धा मी वाचली आहेत. नाटक आणि साहित्याबरोबर कवितांची आवड आहे. त्यामुळे विं.दा.करंदीकर, शांता शेळके, बालकवी आणि कवी ग्रेस यांच्या कविताही मी आवर्जून वाचल्या. महाविद्यालयीन जीवनात माझे वाचन थोडे कमी झाले. विद्यार्थी चळवळी आणि आंदोलनांमुळे पुस्तके वाचायला फारसा वेळच मिळाला नाही. मात्र या चळवळी किंवा आंदोलनांचा एक फायदा नक्की झाला, तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळ्वलकर गुरुजी यांचे विचार वाचता आले आणि त्याचबरोबर वि.दा.सावरकर लिखित काळे पाणी, हिंदुत्व,गोमंतक, माझी जन्मठेप आदी पुस्तके याकाळात वाचली. बारावीची परीक्षा दिल्यानंतर अभ्यासाची एवढी आवड नसल्याने पुढील शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल अभ्यासक्रमाची निवड केली. तिथेच मला खरी अवांतर वाचनाची आवड लागली. तेव्हा मला हे कळले की सर्वार्थाने समृध्द होण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. जवळ जवळ ५ वर्ष मी सकाळी ९ पासून ते संध्याकाळी ६ असा कार्यालयीन वेळेप्रमाणेच वाचन करायचो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध अँड हिज धम्म, रिडल्स ऑफ हिंदू धर्म, डाव्या विचारसरणीशी निगडित दास कॅपिटल, कार्ल मार्क्स यांचं तत्वज्ञान, साने गुरुजी यांचे ‘पाश्चिमात्य तत्वज्ञानाच्या कथा’, डॉस्को वास्की यांचे ‘अँन इडियट’, ‘क्राईम अँड पनिशमेंट’ ही पुस्तके मी वाचली आहेत. एलिझाबेथ थिएटर आणि संपूर्ण शेक्सपिअरही मी आवडीने वाचले आहेत. मॅक्सिम गॉर्की यांचं आई, प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं’, आ.ह.साळुंके लिखित ‘विद्रोही तुकाराम’ मला वाचावयास आवडत. सीताराम बाळ यांनी बा.सी.मर्ढेकर यांच्या कवितांचे केलेले समीक्षण, महात्मा गांधी यांचे ‘माझे सत्याचे प्रयोग’, पु.शिं. रेगे यांच्या निवडक कविता, जवाहरलाल नेहरू यांचे आत्मचरित्र, सिग्मंड फ्राईड यांचं इंटरप्रिटेशन ऑफ ड्रिम्स अशी विविध पुस्तकेही मी वाचली आहेत. मला सगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला आवडत असले तरी त्यातल्या त्यात तत्वज्ञान वाचवायास खूप आवडते. कुसुमाग्रजांच्या अनेक कविता, दया पवार यांचं ‘बलुतं’, नरेंद्र जाधवांचे ‘आमचा बाप अन आम्ही’ भालचंद्र नेमाडे याचे हिंदू, कोसला ही पुस्तकेही मी आवडीने वाचली आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मुंबईची लावणी, फकिरा, संभाजी भगत यांचे कातळाखालचे पाणी, जी.ए.कुलकर्णी यांचं डोहकाळिमा , जयवंत दळवी यांचं ‘अधांतरी’ ही पुस्तकेही खूप आवडली आहेत. चिं. त्र्यं. खानोलकर लिखित कोंडरा, रात्रकाळी घागर काळी, अजगर ही पुस्तके मला वाचावयास खूप आवडतात. कारण त्यांच्या कथांमध्ये ज्या प्रतिमा असतात, त्या खूप वेगळ्या असतात. सध्या मी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावर आधारित ‘१०६ हुतात्मा चौक’ या चित्रपटाचे लेखन करत असल्यामुळे लालजी पेंडसे यांचं महाराष्ट्राचे महामंथन, य.दि.फडके यांचं विसाव्या शतकातील महाराष्ट्र, रविकिरण साने यांचे लढा संयुक्त महाराष्ट्राचाचे आठही खंड आणि आचार्य अत्रे यांचे ‘झालाच पाहिजे’ ही पुस्तके मी वाचत आहेत. माझ्या घरात पाच ते साडेपाच हजार पुस्तके आहेत. तरीही इतकी पुस्तके ठेवायला घरात विशिष्ट असे बुकशेल्फ नाही. सगळी पुस्तके घरातल्या एका कपाटात व्यवस्थितपणे मांडून ठेवली आहेत. पुस्तकांचं सर्वात जास्त शेअरिंग हे माझे वडील, माझी बायको आणि माझ्या काही मित्रांबरोबर होते. दीपक भागवत या माझ्या मित्रामुळे मला युरोपियन तत्वज्ञानाशी ओळख झाली. त्यासंदर्भातले साहित्य वाचनात आले. त्याच्यामुळेच डाव्या विचारसरणीपासून ते मानवतावादी विचारसरणी पर्यंत माझा हा वाचनाचा प्रवास झाला. हल्ली मला पुस्तकवाचनापेक्षा जिवंत माणूस वाचायला खूप आवडते. पुस्तक वाचनामुळे मी आजूबाजूच्या गोष्टी या कान,डोळे, मेंदू उघडे ठेवून वाचावयास शिकलो. य.दि.फडके यांचे ‘आगरकर’, डी.डी. कोसंबी यांचे ‘स्टडी ऑफ मॉर्डन इंडिया’ ही माझी काही पुस्तके जेव्हा हरवली, तेव्हा खूप हळहळ वाटली होती. संपूर्ण शेक्सपिअर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निवडक वाङमय, डी.डी.कोसंबी यांचे अँन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री हि माझ्या पुस्तक संग्रालयातील दुर्मिळ आणि अनमोल अशी पुस्तके आहेत. आजच्या तरुण पिढीला मी सांगू इच्छितो कि जेवढे वाचन करता येईल, तितके करा. जे वाचले, त्याचे चिंतन, मनन करा. त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व विकसीत होईल. फॉर आणि अँटी असे दोन्ही बाजूचे वाचा आणि जे पटत नाही त्याचे उत्तर शोधा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माणूस आणि आजूबाजूच्या घडामोडी मग त्या राजकीय, सामाजिक असोत किंवा आर्थिक. त्या नीट समजून घ्या.