कल्याण– मागील काही वर्षापासून शासन सेवेतून कल्याण डोंबिवली पालिकेत साहाय्यक आयुक्त (मुख्याधिकारी संवर्ग) म्हणून येणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून पालिका मुख्यालयात पदभार देऊन कामे करुन घेतली जात होती. या अधिकाऱ्यांच्या अनुभव, ज्ञानाचा लाभ शहराला विकास कामे, त्यांची प्रशासकीय कौशल्ये माध्यमातू होत नव्हता. यावेळी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी शासन सेवेतून आलेल्या साहाय्यक आयुक्तांना प्रभागांमध्ये पदस्थापना देऊन नवीन पायंडा पाडला आहे.

आयुक्तांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. प्रभागातील प्रभाग अधिकारी तथा साहाय्यक आयुक्त हे शासन आदेशाप्रमाणे पदनिर्देशित पद आहे. पालिकेत सरळ सेवेतून भरती झालेला किंवा शासनाकडून आलेला मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी या पदासाठी पात्र असतो. मागील काही वर्षापासून पालिका प्रशासनाने पालिकेतील अनुभव वरिष्ठ कारकून, अधीक्षक, अभियंते यांना प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी पदे देण्यास सुरुवात केली. पालिकेच्या सेवेतील हे कर्मचारी असल्याने त्यांचे स्थानिक पातळीवर भूमाफिया, फेरीवाले, राजकीय मंडळींशी सलोख्याने संबंध असल्याने त्यांनी कधीही प्रभागात सुस्थितीत प्रशासकीय कारभार, फेरीवाले, अतिक्रमणे होणार नाहीत यादृष्टीने प्रयत्न केले नाहीत. या अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधकामांना अभय देणे, फेरीवाल्यांची पाठराखण करणे असे प्रकार करुन शहराची वाट लावली. या माध्यमातून बक्कळ दौलतजादा शहरे बकाल करुन ठेवली, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा >>> राज्यातून बदल्या होऊन आलेल्या पोलिसांच्या अखेर नेमणुका; ठाणे पोलिसांनी नेमणुकांचे आदेश काढले

पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांची ही ढिसाळ कार्यपध्दती पाहून वास्तुविशारद संदीप पाटील यांनी प्रभाग हे महसुली उत्पन्नाचे, नागरी सुविधा देण्याचे पालिकेचे मुख्य ठिकाण आहे. तेथे सक्षम अधिकारीच कार्यरत असला पाहिजे म्हणून शासन सेवेतील साहाय्यक आयुक्तांना ऑगस्ट २०१६ च्या महासभेच्या ठरावाप्रमाणे प्रभागात नियुक्त्या देण्याची मागणी आयुक्तांकडे केली.

या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाहीतर नगरविकास विभागाकडे दाद मागण्याची तेथे न्याय मिळाला नाहीतर, उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा वास्तुविशारद संदीप पाटील यांनी प्रशासनाला दिला होता. आयक्तांनी पाटील यांच्या तक्रारीची दखल घेतली.

शासन सेवेतील सर्व साहाय्यक आयुक्तांना एक न्याय देणे आवश्यक असताना लेखाधिकारी निवेदिता पाटील, कर विभागाच्या साहाय्यक आयुक्त स्मिता मांडगे यांनाही प्रभागात पदस्थापना देण्याची मागणी करणार आहे. अन्यथा नगरविकास विभागाकडे तक्रार करणार आहे, असे संदीप पाटील यांनी सांगितले. एक साहाय्यक आयुक्त कल्याण मधील एका वजनदार लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने पालिकेत आली आहे. एक वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याच्या मित्राची नातेवाईक असल्याने त्यांना मुख्यालयात पदस्थापना देण्यात आल्याची चर्चा आहे. एक साहाय्यक आयुक्त दालन, वाहन यासाठी आक्रमक असल्याने अधिकारी हैराण आहेत.

हेही वाचा >>> ठाण्यातील रुग्णालयामधील मृत्यूप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल – मंत्री दीपक केसरकर

प्रभागातील नियुक्त्या साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात- ड प्रभाग, साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे- ह प्रभाग, सोनम देशमुख- ग प्रभाग. तुषार सोनवणे हे शासन सेवेतील अधिकारी क प्रभागात यापूर्वीच कार्यरत आहेत. अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे ३१ ऑगस्टला निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी साहाय्यक प्रीती गाडे यांना पदस्थापना देण्यात येणार आहे. साहाय्यक आयुक्त निवेदिता पाटील यांना लेखा अभियांत्रिकी विभागात लेखा अधिकारी पद देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.