रोटरीची पालिकेवर खर्चाचा बोजा न टाकता सूतिकागृह चालविण्याची हमी
कल्याण डोंबिवली पालिकेच्या तिजोरीला एक रुपयाची तोशीस लागून न देता, डोंबिवलीतील टिळक रस्त्यावरील पडझड झालेल्या सूतिकागृहाची नव्याने उभारणी करून ते अत्याधुनिक वैद्यकीय साधनसामग्रीने चालविण्याची तयारी दर्शवूनही रोटरी क्लब डोंबिवली ईस्टचा हा प्रस्ताव प्रशासनाने लाल फितीत अडकवून ठेवला आहे.
रोटरीने तशा आशयाचे पत्र आठ महिन्यांपूर्वी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहे. आयुक्तांनी सूतिकागृह उभारणीसाठी रोटरी विकास ट्रस्टने पुढाकार घेतला तर चांगलेच आहे, अशी सकारात्मक भूमिका सुरुवातीला घेतली होती; परंतु आता आठ महिने उलटूनही पालिकेकडून चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव न आल्याने, रोटरी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रोटरीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाने आपल्या मर्जीतील शहरातील एका वैद्यकीय व्यावसायिकाला सूतिकागृह चालविण्यासाठी देण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. येत्या शनिवारच्या सर्वसाधारण सभेत ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर सूतिकागृह विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला आहे. त्यामुळे सूतिकागृहाचा बंदिस्त विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गेली पाच वर्षे शहराच्या मोक्याच्या ठिकाणचे पालिकेचे सूतिकागृह बंद आहे. सूतिकागृहाची इमारत धोकादायक झाल्याने ते गरिबाचा पाडा भागात स्थलांतरित करण्यात आले आहे. या सूतिकागृहात दररोज १०० ते १५० महिला, बालकांची नियमित तपासणी केली जायची. दर महिन्याला १०० महिलांच्या बाळंतपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात येत असत. शहरी, ग्रामीण भागातील स्त्रिया या सुविधेचा सर्वाधिक लाभ घेत असत. जुन्या इमारतीच्या ठिकाणी रोटरी ट्रस्टला सूतिकागृह उभारण्याची व चालविण्यासाठी परवानगी दिली, तर या उभारणीसाठी येणारा सुमारे २० कोटींचा खर्च रोटरी विकास ट्रस्ट स्वफंडातून करील. पालिकेने फक्त भाडेपट्टय़ाने ही सूतिकागृहाची जमीन ट्रस्टला उपलब्ध करून द्यावी. इमारत बांधकाम व अन्य खर्चाच्या उभारणीसह वाढीव खर्चाचा प्रश्न निर्माण झाला तर आंतरराष्ट्रीय रोटरी, दानशूर व कॉपरेरेट यांच्या माध्यमातून निधी उभारण्यात येईल. असा प्रस्ताव ‘रोटरी’ने प्रशासनाला सादर केला आहे. सूतिकागृह विकासाचा प्रस्ताव लवकर मार्गी लागून महिला, बाल रुग्णांना तत्पर वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, हा प्रकल्प लवकर आकाराला यावा म्हणून पालिका प्रशासनाला सूचना कराव्यात आणि सहकार्य करण्यासाठी सूचित करण्याची मागणी ट्रस्टने मुख्यमंत्र्यांकडे जानेवारीमध्ये केली होती. ‘अधिकाधिक दर्जेदार रुग्णसेवा दिली गेली पाहिजे. या ठिकाणी व्यापारीकरण होता कामा नये. एकदा सूतिकागृह चालवायला घेतल्यानंतर ते पूर्ण क्षमतेने चालविले पाहिजे’ असे प्रशासनाचे म्हणणे आहे एका पालिका सूत्राने सांगितले.

शैक्षणिक संस्था
मुंबईतील प्रत्येक रुग्णालयाला शैक्षणिक संस्थेची जोड आहे. त्यामुळे प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका रुग्णालयात वेळेवर उपलब्ध होतात. तशीच शैक्षणिक सोय सूतिकागृहात उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे देश, परदेशातील तज्ज्ञ डॉक्टर यांना रुग्णसेवेसाठी बोलविणे, त्यांची व्याख्याने, मार्गदर्शन डॉक्टर, परिचारिकांसाठी ठेवणे, असे उपक्रम या शैक्षणिक सुविधेच्या माध्यमातून करणे शक्य होईल, असे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले.

कसे असेल सूतिकागृह
अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयात फक्त स्त्रिया आणि बालकांना वैद्यकीय सेवा देण्यात येईल. ५० रुग्णखोल्या स्त्रिया व ५० बालकांसाठी असतील. अतिदक्षता विभागाच्या २५-२५ खोल्या असतील. २६ हजार चौरस फूट क्षेत्रात सूतिकागृहाचे नवीन बांधकाम करण्यात येईल. ‘नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल’च्या मानकाप्रमाणे रुग्णालयाची उभारणी करण्यात येईल. १०० खाटांचे, चार माळ्यांचे हे रुग्णालय आहे. केंद्र, राज्य शासनाच्या सर्व आरोग्यविषयक सुविधांचा रुग्णांना लाभ देण्यात येईल.