कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण पूर्व ड प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतेमधील दिरंगाई, असमाधानकारक नाले, गटार सफाई या विषयांवरून आयुक्त अभिनव गोयल यांनी ड प्रभागातील मुख्य स्वच्छता निरीक्षक तथा स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच, या प्रकरणाला जबाबदार धरून याच प्रभागातील तीन आरोग्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या.

आयुक्त गोयल यांच्या निर्दशावरून सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी ही निलंबन आणि कारणे दाखवा नोटिसीची प्रक्रिया पार पाडली. पदभार स्वीकारल्यापासून आयुक्त गोयल यांनी पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई, गटार सफाई आणि शहरातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला आहे. गुरूवारी आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याण पूर्वेतील ड प्रभागातील विविध भागात फिरून नाले सफाईची पाहणी केली. त्यावेळी त्यांना काही ठिकाणी गाळ, कचरा तुंबला असल्याचे आढळले. तसेच काही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेची कामे योग्यरितीने झाले नसल्याचे आढळले.

याप्रकरणी आयुक्तांनी नाले सफाईच्या असमाधानकारक कामाबद्दल नाराजी व्यक्त करून जबाबदार स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांना जाब विचारला. ते समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने आयुक्त गोयल यांनी त्यांना तात्काळ निलंबित करत असल्याचे स्पष्ट केले. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पदभार स्वीकारतानाच आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे स्वच्छता अधिकारी खैरे आणि त्यांच्या सहकारी तीन आरोग्य निरीक्षकांनी कर्तव्यात कसूरपणा केल्याने आयुक्तांच्या निर्देशावरून सामान्य प्रशासन विभागाने या चारही कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले, कल्याण पूर्व भागातील नाले सफाईची कामे एक वर्षाच्या कालावधीसाठी ठेकेदाराला देण्यात आली आहेत. त्यामुळे ठेकेदार मनमानी करून ही सफाई करतो. नाले, गटार सफाई करणारे बहुतांशी ठेकेदार हे राजकीय आशीर्वाद असलेले आहेत. त्यांना काही सूचना केली की ते थेट त्यांच्या नेत्यांना सांगतात. मग नेत्यांचे शब्द ऐकावे लागतात. त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दोन्ही बाजुने कोंडी होत आहे, असे कर्मचाऱ्यांनी नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले.

आठ जण निलंबित

आयुक्त अभिनव गोयल यांनी मागील दोन महिन्यापूर्वी पदभार स्वीकारल्यापासून कर्तव्यात कसूरपणा करणाऱ्या एकूण सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये पालिका रुक्मिणीबाई रुग्णालयातील सहा कर्मचारी, लेखा विभागातील एक लिपिक यांचा यात समावेश आहे. आयुक्तांच्या या कठोर शिस्तीचा कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण पूर्व ड प्रभागातील स्वच्छता अधिकारी खैरे यांना असमाधानकारक कामगिरी या विषयावरून निलंबित केले आहे. याच प्रभागातील तीन आरोग्य निरीक्षकांना वरिष्ठांच्या निर्देशावरून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
वंदना गुळवे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.