कल्याण : येत्या आठ दिवसाच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे पूर्ण करा. खराब रस्ते सुस्थितीत करा, असे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी मान्सुनपूर्व आढावा बैठकीत दिले. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पालिका, एमएमआरडीएमार्फत काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे डोंबिवली, कल्याणमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. सेवा वाहिन्या टाकणाऱ्या खासगी, शासकीय संस्थांनी शहरातील रस्ते खोदून ठेवले आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात आली नाही तर शहरात वाहतूक कोंडी बरोबर रस्त्यावरील चिखलातून नागरिकांना येजा करावी लागेल, अशी परिस्थिती शहरात आहे.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते सुस्थितीत, खड्डे भरण्याची कामे प्राधान्याने पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांना पावसाळ्यात खड्ड्यातील रस्त्यांचा त्रास होऊ नये म्हणून आयुक्त डाॅ. दांगडे यांनी काल पालिका स्थायी समिती सभागृहात अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी एमएमआरडीए, एमएसआरडीसी, महावितरण, वाहतूक विभागाचे अधिकारी, याशिवाय अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, शहर अभियंता अर्जुन अहिरे उपस्थित होते.पाऊस सुरू होण्यापूर्वी रस्ते संबंधित सर्व यंत्रणांनी रस्ते सुस्थितीत करावेत, खड्डे भरण्याची कामे पूर्ण करावीत. ही कामे करताना रात्रीची वेळ निवडावी जेणेकरुन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत केल्या.
हेही वाचा… डोंबिवलीत फेरीवाल्यांची पादचाऱ्याला मारहाण
रहिवास मुक्त अतिधोकादायक इमारती प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी जमीनदोस्त कराव्यात. महावितरणने अशा इमारतींमधील वीज पुरवठा खंडित करण्यासाठी सहकार्य करावे. रस्त्यावरील राडारोडा पाऊस सुरू होण्यापुूर्वी उचलण्याचे नियोजन प्रभागस्तरावरुन करावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. पाऊस सुरू झाल्यानंतर साथीचे रोग पसरतात. हे टाळण्यासाठी शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या इमारत बांधकामांच्या ठिकाणी खोदलेले खड्डे, त्यामधील पाणी उपशाविषयी विकासकांना सूचना करावी. त्याठिकाणी साथरोग प्रतिबंधक उपाययोजना आरोग्य विभागातर्फे करण्यात येतील. अशी ठिकाणे साहाय्यक आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणावीत, असे साथरोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
हेही वाचा… कल्याण-डोंबिवलीतील दहा प्राथमिक इंग्रजी शाळा अनधिकृत, ‘सीबीएसई’च्या तीन शाळांचा समावेश
रस्ते कामे सुरू असलेल्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, इतर खासगी सेवा वाहिन्या एजन्सींनी आपले संपर्क क्रमांक कामाच्या ठिकाणी जाहिर करावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले.