कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून सल्लागार संस्थेची नियुक्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशीष धनगर, डोंबिवली

ध्वनी, वायू, जल अशा तिन्ही प्रकारच्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येला तोंड देत असलेल्या कल्याण आणि डोंबिवली या शहरांतील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने विस्तृत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाकरिता प्रशासनाने सल्लागार संस्थेची नेमणूक केली असून येत्या दोन महिन्यांत या आराखडय़ाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.

कल्याण, डोंबिवली या शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत असताना प्रदूषणाची समस्या येथे गंभीर बनत चालली आहे. या दोन्ही शहरांतील औद्योगिक वसाहतींत मोठय़ा प्रमाणात रासायनिक कंपन्या कार्यरत असून या कंपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे शहराचे वायुप्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. शहरातील मुख्य जलस्रोतांमध्ये झालेले प्रदूषणही धोक्याकडे इशारा करत आहे. हे सुरू असतानाच शहरात ध्वनिप्रदूषणाची समस्याही उग्र रूप धारण करू लागली आहे. यासंदर्भात २०१० मध्ये दाखल झालेल्या एका याचिकेवर गेल्या वर्षी निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘निरी’ या संस्थेच्या माध्यमातून जुलै २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात शहरातील २५ ठिकाणी ध्वनिप्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले होते. त्यानुसार हे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला कळवले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता यासंदर्भातील विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी एका सल्लागार संस्थेची नेमणूक केली असून येत्या दोन महिन्यांत हा आराखडा तयार होईल व त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

ध्वनिप्रदूषणाची ठिकाणे

‘निरी’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात डोंबिवली रेल्वे स्थानक, टिटवाळा-आंबिवली रोड जंक्शन, कोपर रेल्वे स्थानक, कल्याण-निर्मल रस्ता, दुर्गाडी चौक, टिटवाळा-आंबिवली रस्ता, कल्याण-सापे रस्ता, कल्याण-बदलापूर रस्ता, शिळफाटा परिसर, सुभाष रस्ता, शंकरेश्वर रस्ता, एचएन रस्ता, ओमेगा इंडस्ट्री, केबी इंडस्ट्री, डिएएसकेएम इंडस्ट्री, कंडोमपा मुख्य पाणी शुद्धीकरण प्रकल्प परिसर, सिनेमॅक्स कल्याण परिसर, डोंबिवली पूर्वेतील मासळी बाजार, आदर्श सोसायटी, गणेशनगर, हनुमाननगर, ठाकुरवाडी, टिटवाळा गणपती मंदिर, बिर्ला महाविद्यालय परिसर आणि आयकॉन रुग्णालय परिसर या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे.

शहरातली ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहेत.

– गोपाल भांगरे, उपअभियंता, कल्याण-डोंबिवली महापालिका.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc comprehensive plan to prevent noise pollution zws
First published on: 18-12-2019 at 01:30 IST