* क्रीडा सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष * क्रीडासंकुलाचा लाभ खेळाडूंना नाही
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहराला क्रीडानगरी अशी एक वेगळी ओळखही आहे. अनेक मान्यवर क्रीडापटू, क्रीडाशिक्षक आणि तज्ज्ञ मंडळी यांच्या प्रयत्नांनी या नगरीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले आहे. मात्र महापालिका स्तरावरून त्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनाच्या बाबतीत मात्र कमालीची उदासीनता आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कल्याण-डोंबिवलीतून तयार व्हावेत या उद्देशाने महापालिकेने केलेला प्रयत्न म्हणजे क्रीडासंकुल. मात्र या क्रीडासंकुलाची झालेली दुरवस्था क्रीडाप्रेमींना अस्वस्थ करणारी आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी वारंवार होत राहिल्या आहेत. मात्र या क्रीडासंकुलाचा वापर केवळ सार्वजनिक कार्यक्रम, सभा, महोत्सव यांसाठीच अधिक झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील खेळाडू क्रीडा सुविधांपासून व खेळापासून वंचित राहत आहेत. उदासीन लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन याला जबाबदार असल्याची भावना खेळाडू व नागरिकांमध्ये आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून १९९१ मध्ये मिळालेल्या भूखंडावर डोंबिवलीमध्ये क्रीडासंकुल उभारण्यात आले. साधारण २६ कोटी रुपये खर्च करून डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात १९.१३ एकर जागेवर उभ्या केलेल्या या क्रीडासंकुलात सर्व मैदानी खेळांसाठी मोठे क्रीडांगण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदिस्त सभागृह, ऑलिम्पिक धर्तीचा तरणतलाव, जिमनॅशियम व ध्यानधारणा केंद्र, २५ हजार प्रेक्षक बसतील अशी प्रेक्षक गॅलरी, नाना-नानी पार्क, जॉगिंग ट्रॅक, खुले कलादालन अशा सोयी-सुविधांची निर्मिती करण्यात आली, मात्र मुख्य मैदानात प्रेक्षकांना बसण्यासाठी अतिरिक्त क्षमतेची प्रेक्षक गॅलरी बांधणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूटिंगरेंज बांधणे, खेळाडूंसाठी १०० बेडचे वसतिगृह बांधणे, ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक तयार करणे, जॉगिंग ट्रॅक, बंदिस्त क्रीडागृहात अ‍ॅकॉस्टिकचे काम करणे, लाकडी फ्लोरिंग तयार करणे यांसारखी कामे १० ते १५ वर्षांपासून रखडूनच राहिली. या संकुलाच्या देखभालीसाठी वर्षभरात एक कोटी खर्च येतो, तर उत्पन्न मात्र अत्यल्प आहे.
ठाणे जिल्ह्य़ात डोंबिवली आणि रायते या दोनच शहरांत अद्ययावत क्रीडासंकुले तयार आहेत. यामुळे शासनाने या दोन क्रीडासंकुलांना जिल्हा क्रीडासंकुलांचा दर्जा मिळावा व आंतरराष्ट्रीय खेळासाठी सरकारी अनुदान मिळावे, अशी मागणी महापालिकेने सरकारकडे प्रस्ताव पाठवून केली आहे. या मागण्यांसाठी विविध क्रीडा संघटना गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. क्रीडासंकुलाचा वापर सध्या सभा, महोत्सव, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी केला जात आहे. इतर वेळेस काही क्रीडा संस्था येथे सायंकाळच्या वेळी सराव करताना दिसतात; परंतु येथे पुरेशा सोयी-सुविधा नसल्याने त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात मैदानात गाळ साचतो, इतर वेळेस त्या मैदानाची योग्य निगा न राखल्याने त्याचा वापर कोणत्याही खेळासाठी करता येत नाही. येथील बंदिस्त सभागृह, ध्यानधारणा केंद्र व जिम्नॅशियम तर कायमस्वरूपी बंद असते.

महापालिका, एमआयडीसी वाद
क्रीडासंकुलाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या बांधकामाचा वाद महापालिका प्रशासन आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात रंगला होता. एमआयडीसीने महापालिकेला परवानगी न घेतलेल्या बांधकामाबद्दल ३२ कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस दिली होती. अखेर शासनाच्या मध्यस्तीने ही रक्कम कमी करून १२ कोटी रुपये करण्यात आली.

डोंबिवली क्रीडासंकुलाचा विस्तार
’जिम्नॅशियम व ध्यानधारणा केंद्र क्षेत्रफळ १३९ चौ.मी.- प्रकल्प खर्च – १.०५ कोटी
’बंदिस्त क्रीडागृह – १९३७ चौ.मी.- प्रकल्प खर्च १७२ लक्ष