उत्सव काळात आखण्यात आलेल्या नियमांना मंजुरी देण्यास एकीकडे ठाण्यातील नेत्यांकडून टंगळमंगळ सुरू असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मात्र यासंबंधीच्या ४६ कलमी आचारसंहितेस मान्यता देण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच महापालिकांना या नियमावलीचा अवलंब करणे बंधनकारक आहे. रस्त्यांवर साजरे होणाऱ्या उत्सवांवर काही प्रमाणात र्निबध घालणाऱ्या या नियमावलीसंबंधी सर्वपक्षीय नगरसेवक कोणती भूमिका घेतात याविषयी औत्सुक्याचे वातावरण होते. मात्र गोंधळातच ही नियमावली मंजूर करण्यात आली.
या नियमावलीनुसार उत्सव काळात ध्वनिप्रदूषणासंबंधी काटेकोर नियमांची आखणी करण्यात आली आहे. आवाजाच्या गुणवत्तेचा दर्जा औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल, रात्री ७० डेसिबल, वाणिज्य विभागात ६५ डेसिबल, रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल, रात्री ४५ डेसिबल, शांतता विभागात दिवसा ५० डेसिबल, रात्री ४० डेसिबल यापेक्षा अधिक असता कामा नये.
मंडप उभारणीसाठी नियमावली
– राष्ट्रीय सणांसाठी फक्त एक दिवस मंडप उभारणीला परवानगी दिली जाणार आहे. दहीहंडी (एक दिवस), नवरात्रोत्सव (बारा दिवस), शिवजयंती (तीन दिवस), रमजान, बकरी ईद (तीन दिवस), मोहरम (तीन दिवस), नाताळ (पाच दिवस), गुड फ्रायडे (एक दिवस), डॉ. आंबेडकर जयंती (तीन दिवस), ११ दिवसांचा गणेश उत्सवास (पंधरा दिवस), ७ दिवसांचा गणेशोत्सव (अकरा दिवस) मंडप उभारणीस परवानगी मिळणार आहे. – उत्सव प्रसंगी मंडळांना मंडप, उत्सव कमान, व्यासपीठ उभारायचे असेल तर विहित नमुन्यात ३० दिवस अगोदर मंडळांनी पालिकेच्या स्थानिक प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याकडे अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
– अर्ज दाखल केल्यानंतर तीन दिवसाच्या आत स्थानिक पोलीस प्राधिकरण, पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा, अग्निशमन दल यांचे ना हरकत दाखले आणणे आवश्यक आहे.