२७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाल्यानंतरही सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा लढा सुरूच आहे. महापालिका प्रशासनाचे अधिकारी मंगळवारी भोपर ग्रामपंचायत कार्यालयात दप्तर जमा करण्यासाठी गेले असता त्यांना समितीने तीव्र विरोध केला. पोलीस बंदोबस्त कमी असल्याने अखेर पालिका प्रशासन रिकाम्या हाताने माघारी फिरले.
मंगळवारी दुपारी भोपर, आजदे ग्रामपंचायत कार्यालयात पालिका अधिकारी दप्तर जमा करण्यास येणार असल्याची माहिती संघर्ष समितीला मिळाल्याने समिती सदस्य व गावकरी मोठय़ा संख्येने कार्यालयाबाहेर उपस्थित होते. पालिकेचे ई प्रभाग क्षेत्राचे अधिकारी भागाजी भिंगारे हे दप्तर जमा करण्यासाठी गेले असता समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, जनार्दन काळण यांसह गावकऱ्यांनी त्यांना अटकाव केला. भांगरे यांच्यासोबत इतर कर्मचारी व पोलीस होते. मात्र त्यांची संख्या अल्प असल्याने भांगरे यांनी रिकाम्या हाती माघारी फिरणे पसंत केले. भांगरे यांनी जबरदस्ती केल्यास गावात अशांतता माजून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा समितीच्या सदस्यांनी दिला. आजदे ग्रामपंचायतीतही अशीच परिस्थिती असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी तिकडे न जाणेच पसंत केले.