कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या सहा प्रभागांमध्ये सर्वंकष स्वच्छतेसाठी पालिकेकडून सुमित एल्कोप्लास्ट या खासगी कंपनीच्या माध्यमातून स्वच्छतेचा चेन्नई कित्ता राबविला जात आहे. मागील तीन महिन्याच्या काळात या खासगी कंपनीने पालिकेच्या कल्याण मधील ड, जे, आय आणि डोंबिवलीतील फ, ग, ह प्रभागांमधून विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत एकूण दोन हजार ४०० हून अधिक टन कचरा संकलन करण्यात आले आहे.
तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात स्वच्छतेचा हा कित्ता यशस्वी झाला आहे. सुमित एल्कोप्लास्टक खासगी कंपनी या शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेचे काम करते. हीच कंपनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सहा प्रभागांमध्ये हे काम करत आहे. खासगी कंपनीचे कर्मचारी दिवस, रात्र चार पाळ्यांमध्ये शहरातील प्रस्तावित केलेले प्रभाग स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत. या स्वच्छता निकषांवर कंपनीला पालिकेकडून देयक मिळणार आहे. त्यामुळे कचरा संकलन आणि स्वच्छता कामात कोठेही दिरंगाई होणार नाही याची विशेष दक्षता स्वच्छता अधिकारी, कामगारांकडून घेतली जात आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या सहा प्रभागांसाठी तीन महिन्यांपूर्वी सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेने कचरा संकलन आणि स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. महापालिका प्रशासनाकडून या सातपैकी ड, जे, फ, ग, ह आणि आय या ६ प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित एका प्रभागाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या सहाही प्रभाग क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेंतर्गत दोन हजार ३६३ टनांहून अधिक कचरा संकलन करण्यात आले आहे.ई प्रभागक्षेत्र वगळता उर्वरित ६ प्रभाग क्षेत्रामध्ये हे स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित ई या प्रभागाची हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ती पूर्ण होईल असा विश्वास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सहाही प्रभागांमध्ये नियमितपणे दिवसातून ३ वेळा कचरा उचलण्यात येत आहे.
या प्रभागांतील काही ठिकाणी पूर्ण स्वच्छता करूनही सतत कचरा टाकण्यात येत असल्याने अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कॉम्पॅक्टर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून मोकळ्या जागेमध्ये पडणारा कचरा त्या कॉम्पॅक्टर कंटेनरमध्ये जाईल. या स्वच्छता उपक्रमाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून या प्रभागांचीही आता स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत प्रभागक्षेत्रनिहाय कचरा संकलन ड प्रभाग ४३६ टन, जे प्रभाग ८१६ टन, फ प्रभाग ६८ टन, ग प्रभाग ४१.१६ टन, ह प्रभाग १४६ टन, आय प्रभाग – ८५६ टन.