कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील मुख्य फार्मासिस्ट अनिल शिरपूरकर यांनी डोंबिवलीतील देसलेपाडा येथील लोढा हेरिटेज वास्तु सृष्टी सोसायटीतील आपल्या मालकीचा गाळा पालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी भाड्याने दिला आहे. या माध्यमातून ते पालिकेतून भाडे घेत आहेत. त्याच बरोबर नियमित वेतनही घेत आहेत. असा दुहेरी लाभ घेऊन शिरपूरकर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमातील ‘ऑफिस ऑफ प्राॅफिट’ कलमाचा भंग केला आहे. त्यांना तातडीने पालिका सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते गणेश ताटे यांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.

गेल्या महिन्यात हे प्रकरण उघड होऊनही प्रशासनाने फार्मासिस्ट शिरपूरकर यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते. कडोंमपात नोकरी करत असताना पालिकेला अंधारात ठेऊन बाहेर व्यवसाय करून दुहेरी आर्थिक लाभ घेणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना यापूर्वी पालिकेने सेवेतून बडतर्फ केले. महाराष्ट्र् नागरी सेवा वर्तणूक नियमाच्या ऑफिस ऑफ प्राफिट कलम ३(१) व १५ मध्ये तशी तरतूद आहे.

अनिल शिरपूरकर पालिकेत मुख्य फार्मासिस्ट आहेत. हे माहिती असुनही तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांनी शिरपूरकर यांचा देसलेपाडा येथील गाळा भाड्याने घेण्याचे निश्चित का केले आणि त्या भाडे करारावर स्वाक्षऱ्या का केल्या, असा प्रश्न करून तक्रारदार ताटे यांनी डाॅ. पाटील, डाॅ. शुक्ला यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

२० जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी शिरपूरकर आणि त्यांच्या लगतच्या गाळेधारकाचा गाळा पालिकेने आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी ३३ हजार ७४१ रूपये भाड्याने घेतला आहे. मार्च २०२५ मध्ये या भाडे कराराची मुदत वाढविण्यात आली.

आपण पालिकेचे कर्मचारी आहोत. आपण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाचा भंंग करत आहोत हे माहिती असुनही शिरपूरकर यांनी गाळ्याच्या भाड्यातून दुहेरी लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करत गाळा खरेदी करताना शिरपूरकर यांनी पालिकेला पूर्वसूचना दिली होती का याची माहिती ताटे यांनी मागितली आहे. याप्रकरणी पालिकेने शिरपूरकर यांच्यावर कारवाई केली नाहीतर, येत्या विधीमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार आहोत, असे एका लोकप्रतिनिधीने सांगितले.

फार्मासिस्ट शिरपूरकर यांच्या गाळ्याप्रकरणी एक अहवाल तयार केला आहे. वरिष्ठांना तो दाखल केला जाईल. त्याप्रमाणे कार्यवाही होईल. – डाॅ. दीपा शुक्ला, वैद्यकीय आरोग्य अधिकारी.

आरोग्यवर्धिनी गाळे निश्चिती प्रक्रिया यापूर्वी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी पार पाडल्या. त्यामुळे कोणत्या भाडे करारावर सह्या केल्या हे लक्षात येत नाही. – डाॅ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (निवृ्त).

आरोग्यवर्धिनीसाठी गाळे निश्चित करताना तो कर्मचाऱ्याचा नसावा अशा कोणत्याही शासनाच्या मार्गदर्शक सूचना नव्हत्या. त्यामुळे शासन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्ण सेवेचा विचार करून वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे गाळे निश्चिती त्यावेळी केली. – डाॅ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी.