पाचव्या निविदेला ठेकेदारांची प्रतीक्षा; खर्चाची विभागणी करून सहा स्वतंत्र कंत्राटे
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिराला अवकळा आली असून, त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार निविदा काढूनही ठेकेदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. महापालिकेची आर्थिक परिस्थिती दोलायमान असल्यामुळे सुमारे दोन कोटी रुपयांची डागडुजीची एकत्रित निविदा भरण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. ठेकेदार मिळावेत यासाठी अभियांत्रिकी विभागाने आता नवी शक्कल लढवली आहे. देखभाल, दुरुस्तीच्या कामाचे तब्बल सहा वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये विभाजन केले असून ही निविदा ६ जानेवारी रोजी ठेकेदारांसाठी खुली करण्यात आली. त्याला किती ठेकेदार प्रतिसाद देतात याकडे नाटय़प्रेमी आणि महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
कल्याण येथील आचार्य अत्रे नाटय़गृहात अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे ते डागडुजीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या. एक कोटी ६५ लाखांच्या या निविदेला ठेकेदारांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या निविदेचे चार वेळा नूतनीकरण करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याची चर्चा असल्याने निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याचे काही सूत्रांमार्फत सांगितले जात आहे. नाटय़गृहाची ग्रीन रूम, गालिचा, छताची रंगरंगोटी, आसनव्यवस्था, स्वच्छतागृह अशी सर्वच प्रकारची कामे एकत्रित करण्याचा निर्णय आधी अभियांत्रिकी विभागाने घेतला होता. मात्र, त्यास ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने या नाटय़गृहाच्या डागडुजीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. पूर्वानुभव लक्षात घेऊन नाटय़गृहाच्या या कामांचे विभाजन करून ती विशिष्ट कामे करणाऱ्या वेगवेगळ्या ठेकेदारांना देण्याचा निर्णय अखेर अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे आचार्य अत्रे नाटय़गृहाच्या कामांची पाचवी निविदा आखण्यात आली आहे.
नाटय़गृहाच्या डागडुजीसाठी निधी आरक्षित आहे. ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आचार्य अत्रे रंगमंदिराच्या डागडुजीला विलंब होत आहे. पाचव्या निविदेमध्ये कामाची विभागणी केली असल्याने ठेकेदारांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
– प्रमोद कुलकर्णी, नगर अभियंता, क.डों.म.पा
निविदेतील कामांची विभागणी
कामाचे स्वरूप निविदा शुल्क
स्त्री-पुरुष स्वच्छतागृहे, ग्रीन रूम, नाटय़गृहाच्या आतील-बाहेरील स्वच्छता, प्लंबिंग ६६,२२,५७०/-
रंगमंचाची दुरुस्ती, आसनव्यवस्था, गालिचा, छताची रंगरंगोटी ७९,४९,७२२/-
गच्चीतील छताचे बांधकाम २९,०२,४८६/-
कीटक नियंत्रण फवारणी ४,९८,४६७/-