ठाणे : बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अटकेत असलेली दुय्यम नटी केतकी चितळे हिच्या जामीनअर्जावर आता १६ जूनला निर्णय होणार आहे. मंगळवारी तिच्या जामीनअर्जावर ठाणे न्यायालयात युक्तीवाद झाला. त्यानंतर न्यायाधीशांनी हा निर्णय राखून ठेवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर समाजमाध्यमावर हिणकस लिखाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळे हिला अटक केली होती. तिला याप्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळताच रबाळे पोलिसांनी ॲट्रोसिटीच्या प्रकरणात तिचा ताबा घेतला होता. केतकी विरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर केतकीने तिचे वकिल वसंत बनसोडे यांच्या मार्फत जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मंगळवारी या जामीनअर्जावर ठाणे न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. या अर्जावरील निर्णय १६ जून पर्यंत राखून ठेवला आहे.
