पारंपरिक आगळ्या पद्धतीचा मत्स्याहार हल्ली खवैयांमध्ये बराच लोकप्रिय आहे. खवैये त्या पारंपरिक चवीच्या शोधात असतात. ठाण्यातील ‘कोळी डिब्बा’मध्ये खास घरगुती मसाल्यात बनविलेले विविध प्रकारचे मांसाहारी पदार्थ मिळतात.
सामिष आहार घेणाऱ्यांना सरसकट मांसाहारी म्हटले जात असले तरी त्यातील बहुतेक मत्स्याहारी असतात. ताजे फडफडीत मासे खायला अनेकांना आवडते. त्यातही कालवणातील माशांपेक्षा तळलेले मासे खाणे म्हणजे ब्रह्मानंदी टाळीच असते. मीठ-मसाला लावून रव्यात लडबडलेल्या माशांच्या तळलेल्या तुकडय़ा अधिक पसंत केल्या जातात. ढोकाळी परिसरातील ‘कोळी डिब्बा’ नावाचे कॉर्नर सध्या तेथील चविष्ट माशांसाठी प्रसिद्ध आहे. तसे पाहायला गेले तर हे छोटेसे दुकान आहे. मात्र येथील माशांना पारंपरिक कोळी पद्धतीची चव आहे. ती चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहते. सर्वसाधारणपणे पापलेट, सुरमई, ओले बोंबील, मांदेली, बांगडे आदी प्रकारचे मासे खवैये पसंत करतात. याशिवाय रायगड-ठाणे परिसरातील खाजण जमिनीत मिळणारा जिताडा खवैयांमध्ये विशेष प्रिय आहे.
छोटय़ा तळ्यामध्ये जिताडय़ाची पैदास केली जाते. काही ठरावीक ठिकाणीच हा मासा मिळतो. ‘कोळी डिब्बा’मध्ये हमखास जिताडा मिळतो. त्यामुळे फार दूरचे खवैये येथे येतात. माशांमध्ये जिताडा सर्वात चविष्ट समजला जातो. इथे तळलेला जिताडा मिळतोच, शिवाय जिताडय़ाचे कालवणही उपलब्ध आहे. पापलेट, सुरमई आता सगळीकडे सर्रास मिळते. मात्र ‘कोळी डिब्बा’चे वैशिष्टय़ म्हणजे इथे कालवे, तिसऱ्या, जवळा, बोंबील ठेचा आदी पारंपरिक पदार्थही मिळतात. किंबहुना या पदार्थानाच अधिक मागणी असल्याचे दुकानाचे मालक अभिजीत मोकाशी यांनी सांगितले. आगरी-कोळी स्पेशल कांजी करताना त्यामध्ये भाज्या, कोलंबी, घरगुती मसाले, चिंच आदी जिन्नस एकत्र टाकून ते बनवले जाते. कढईत सर्व भाज्या मसाले घालून शिजवल्या जातात. त्यानंतर त्यात कोथिंबीर आणि चिंच घातली जाते. या पदार्थाला शाक असेही म्हटले जाते. भाज्या आणि कोलंबी असल्याने त्यातून सर्व प्रकारची प्रथिने पोटात जातात. त्यामुळे पौष्टिक शाक किंवा कांजी खाण्यासाठी खवैये येथे गर्दी करतात. इथले गरमागरम शाक सूप अगदी मस्त लागते. स्टार्टर म्हणून अनेक जण हे सूप पिणे पसंत करतात. आपण जसा मिरचीचा ठेचा बनवतो, तसे इथे बोंबलाचा ठेचा मिळतो. सुके बोंबील ठेचून त्यानंतर त्यात मिरची टाकली जाते.
कोलंबी कबाब हाही येथील प्रसिद्ध पदार्थ आहे. त्यात आधी कोलंबी बारीक वाटून घेतली जाते. त्यानंतर त्यात थोडा बटाटा, पाव, मसाला आदी जिन्नस एकत्र केले जातात. मग हे पॅटिस रवा लावून तळले जातात. त्यामुळे गरमागरम पॅटिसच्या दोन-तीन प्लेट अगदी सहजच संपतात. कोलंबीची पोळी बनविताना पीठ तसेच कोलंबी आणि मसाला आदी पदार्थ एकत्र करून त्या पोळ्या तव्यावर भाजल्या जातात. त्याच प्रकारे कालव्याच्या पोळ्याही केल्या जातात. स्टार्टर म्हणून तळलेली करंदीही अनेक जण मागवितात. आगरी-कोळी पद्धतीची मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी येथे मिळते. शिवाय गरमागरम पटणी भाकरी म्हणजेच नाचणी किंवा बाजरीची भाकरीही आहे. पारंपरिक कोळी पद्धत असल्याने घरगुती पदार्थ खाल्ल्याचे समाधान मिळते. आगरी वडे आणि येथील चिकन किंवा मटण खाण्याची मजा काही औरच आहे.
गरमागरम चिकन आणि वडे खाताना खवैये तल्लीन होतात. जागा थोडी असल्याने येथे थांबावे लागते. मात्र कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी वाट ही पाहावीच लागते. खवैयांची त्यासाठी तयारी असते. तितकी सवड काढूनच ते आलेले असतात. काही जण पार्सलही घेऊन जातात. खोबरे आणि कोकमाचे आगळ एकत्र करून केलेली सोलकढीही जेवण झाल्यानंतर पिण्यासाठी पार्सल म्हणून नेली जाते. गप्पांचा फड आणि मनसोक्त जेवणाचा आनंद खवय्ये येथे लुटताना दिसतात. शाकाहारीमध्ये येथे पनीर टिक्का, पनीर बुर्जी मिळते. येथील आंबटगोड ‘टोमॅटो करी’ मस्तच. त्याला टोमॅटोचे सार असेही म्हणतात. दही करी, कोफ्ता करीही केली जाते. त्यामुळे जे मांसाहारी नाहीत, त्यांचीही इथे चांगलीच सोय होते.
कोळी डिब्बा
- कुठे- अे/ ३, शॉप नं-३, हायलॅण्ड गार्डन, हायवे रेसिडेन्सीच्या समोर, ढोकाळी, ठाणे (प.)
- कधी – सकोळी ११ ते रात्री ११