ठाणे – सध्या श्रावण महिना सुरू असून, शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. ठाणे शहरातील एक प्राचीन शिवमंदिरही याला अपवाद नाही. प्रत्येक सोमवारी आणि श्रावण महिन्याच्या खास दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, या मंदिरातील शिवलिंगावर इतर मंदिरांप्रमाणे पाणी अर्पण केले जात नाही. हे वेगळेपण लक्ष वेधून घेते आणि अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, इथे पाणी का अर्पण केले जात नाही? यामागचे शास्त्र आणि परंपरा मंदिरातील गुरुजींनी उलगडली आहे. चला, जाणून घेऊया या अनोख्या परंपरेमागचे रहस्य…
ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले श्रीकौपिनेश्वर हे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात असलेले शिवलिंग हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे शिवलिंग असल्याचे बोलले जाते. या मंदिराला प्राचीन इतिहास लाभला आहे. पेशवेकालीन असलेले हे मंदिर ठाणेकरांसाठी श्रद्धास्थान आहे. या मंदिरात केवळ ठाण्यातील नागरिकच नाही तर, शहराबाहेरील नागरिक देखील दर्शनासाठी येतात. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी नंदी मूर्ती दर्शनाला येणाऱ्यांचे स्वागत करते.
मंदिराच्या आवारात ब्रह्मा, राम, हनुमान, शितला देवी, उत्तरेश्वर, दत्तात्रेय, गरुड, काली आणि गायत्री देवी या देवतांची मंदिरे आहेत. त्यामुळे या मंदिरात आल्यावर प्रत्येकाला प्रसन्न वाटते. या मंदिरात प्रत्येक सोमवारी सकाळ आणि सायंकाळी भाविकांची गर्दी होत असते. तर, श्रावण महिन्यात या मंदिरात एक उत्साहाचे वातावरण असते. हजारोच्या संख्येने भाविक श्रावणातील दर सोमवारी या मंदिरात येत असतात. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी देखील पहाटेपासून नागरिक दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगा लावतात. यादिवशी ठाणेसह इतर शहरातील देखील मोठ्यासंख्येने नागरिक यामंदिरात दर्शनासाठी येतात.
मंदिराचे एक वैशिष्ट्ये आहे. या मंदिरातील शिवलिंगावर इतर मंदिरांप्रमाणे पाणी अर्पण केले जात नाही. हे वेगळेपण लक्ष वेधून घेते आणि अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, इथे पाणी का अर्पण केले जात नाही ? परंतु, यामागील नेमके कारण काय हे मंदिरातील गुरुजींनी स्पष्ट केले आहे.
या कारणामुळे अर्पण केले जात नाही पाणी
कौपिनेश्वर मंदिर हे पुरातनकालीन मंदिर आहे. त्यामुळे या मंदिरातील शिवलिंग देखील पुरातन आहे. या शिवलिंगवर दुध आणि पाणी अर्पण केले जाते. त्यामुळे हे शिवलिंग जीर्ण झाले आहेत. पुरातन मंदिरात असलेल्या या शिवलिंगाचे जतन व्हावे, नागरिकांना याचे वर्षानुवर्षे दर्शन मिळावे यासाठी मंदिर ट्रस्टने या शिवलिंगवर दुपारनंतर पाणी आणि दुध अर्पण करायचे नाही असा निर्णय दहा ते पंधरा वर्षांपूर्वी घेतला आहे. केवळ दुपारी १२.३० पर्यंत येणाऱ्या भाविकांना या शिवलिंगावर पाणी आणि दुध अर्पण करायला मिळते, अशी माहिती मंदिरातील गुरुजी विनायक गाडे यांनी दिली.