पुढील आठवडय़ात सामंजस्य करार होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना सहकार्य करण्याचा निर्णय कोरियन सरकारने बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयानुसार पाणी, घनकचरा, अपारंपरिक ऊर्जा यासंबंधीच्या प्रकल्पांसाठी कोरियन सरकारचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या प्रकल्पांबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आयुक्त जयस्वाल पुढील आठवडय़ात सेऊलला जाणार आहेत.

केंद्र तसेच राज्य शासनामार्फत स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी महापालिकेकडून पावले उचलण्यात येत आहेत. शहरातील पायाभूत सुविधांसह विविध प्रकल्पांची आखणी महापालिकेने केली आहे. तसेच हे प्रकल्प प्रत्यक्षात राबविण्यासाठी महापालिकेने प्रयत्नही सुरू केले आहेत. असे असतानाच कोरियाच्या सेऊल मेट्रोपोलिटन सरकारने ठाणे शहर स्मार्ट बनविण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना मदत करण्याची तयारी दर्शविली. कोरियाच्या सेऊल मेट्रोपोलिटन सरकारच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त जयस्वाल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कोरियाच्या सरकारने हा निर्णय घेतला. महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये झालेल्या या बैठकीला सेऊल मेट्रोपोलिटनचे माजी महापौर आणि सेऊल विद्यापीठाच्या नागरी अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक किम सँग बुम, ग्लोबल अर्बन विभागाचे उपसंचालक किम युसाँग, ग्लोबल प्रोजेक्ट मॅनेजर हिओ येंजू, प्रकल्प सल्लागार वॉन जाँगजून, कोरियन दूतावासच्या मुंबई कार्यालयातून उपसंचालक जिनयांग जंग आदी उपस्थित होते.

करारातील ठळक मुद्दे

२४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, मलनि:सारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, नागरिकांसाठी ऊर्जा कार्यक्षमता आदी प्रकल्प सेऊल मेट्रोपोलिटन सरकारने यशस्वीपणे राबविले असून त्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे ठाणे शहरामध्ये हे प्रकल्प राबविण्यासाठी कोरियन सरकार महानगरपालिकेस सहकार्य करणार आहे. असा बैठकीतील चर्चेदरम्यान निर्णय घेण्यात आला. यासंबंधीचा सामंजस्य करार सेऊल सरकारसोबत होणार असून त्यासाठी आयुक्त जयस्वाल सेऊलला जाणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Korean government help for smart city thane project
First published on: 20-05-2016 at 01:37 IST