ठाणे – ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील बस गाड्यांमध्ये सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांना नेहमीच वादाला सामोरे जावे लागत होते. या समस्येवर उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने “माझी टीएमटी” हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. या ॲपद्वारे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत आहे. परंतू, या ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन तिकीटसह बसचे वेळापत्रक पाहण्याचा एक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कोणतीही माहिती अपलोड करण्यात आली नसल्याचे दिसते. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
ठाणे शहरातील विविध भागात ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ३०० बस गाड्या धावतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशी तिकीट काढताना वाहकांकडून त्यांना वारंवार सुचना देण्यात येते की, तिकीटासाठी सुट्टे पैसे द्यावे. परंतू, अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडताना दिसतात. यावर पर्याय म्हणून ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडुून केली जात होती. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘माझी टीएमटी’ या ॲपची निर्मिती केली. परंतू, या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट नसल्यामुळे प्रवाशांना या ॲप्लिकेशनचा वापर करता येत नव्हता. तांत्रिक त्रुटींमुळे हे ॲप्लिकेशन त्यावेळी सुरु करता आले नव्हते. अखेर जानेवारी २०२५ पासून हे ॲप्लिकेशन प्रवाशांसाठी सुरु झाले. या ॲप्लिकेशनवर प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत असून प्रवाशांचा सुट्टे पैसे राखून ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे. तसेच प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्ट्या पैशांवरुन होणारा वाद देखील थांबला आहे. या ॲप्लिकेशनचा तिकीट काढण्यासाठी मोठ्यासंख्येने प्रवासी वापर करत असले तरी, या ॲप्लिकेशनवर बसच्या वेळापत्रकाचा पर्याय उपलब्ध असूनही त्यात माहिती समाविष्ट नसल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बऱ्याच वेळ बस थांब्यावर बसची वाट पाहत उभे असताना, प्रवासी ‘माझी टीएमटी’ ॲप वर बस येण्याची वेळ पाहण्यासाठी ‘बस टाईम्स’ या पर्यायावर क्लिक करतात. परंतू, त्यावर ‘लवकरच येत आहे’ (कमींग सुन) असे दिसते. त्यामुळे काम पूर्ण झालेले नसतानाही ॲप्लिकेशन का सुरु केले असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे. या ॲप्लिकेशनवर बसचे वेळापत्रक समाविष्ट करण्याचे काम सुरु असल्याची माहिती ठाणे महापालिका परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
माझी टीएमटी ॲपचा वापर कसा करावा ?
गुगल प्ले स्टोरवरुन ‘माझी टीएमटी’ हे ॲप इन्सस्टॉल करावे. मोबाईलमध्ये ॲप इन्टॉल झाल्यावर आपला मोबाईल क्रमांक, नाव त्यावर समाविष्ट करावे. त्यानंतर, तिकीट काढताना सर्च रुट (बस क्रमांक) आणि सर्च स्टॉप (बस थांबा) या दोन्ही पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा. प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाण आणि गंतव्य स्थान याची माहिती समाविष्ट करायची आहे. ही माहिती भरल्यानंतर किती क्रमांकाच्या बस त्या मार्गावर जातात ही माहिती उपलब्ध होते. त्यातील आपण ज्या बसने प्रवास करणार आहोत त्या बस क्रमांकाचा पर्याय निवडून तिकीट काढायची आहे. यावर नेट बॅंकिंग आणि युपीआय चा वापर करून पैसे भरता येतात.
या ॲपचा इतके प्रवासी करतात वापर
जानेवारी २०२५ पासून माझी टीएमटी ॲप प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु झाले. या ॲप्लिकेशनचा वापर गेल्या सहा महिन्यात ६३ हजार ८४० प्रवाशांनी केला आहे. या ॲप्लिकेशनद्वारे दररोज ५ ते ६ हजार प्रवासी तिकीट काढत आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून देण्यात आली.