कोपर-दिव्यातील महिला प्रवाशांना अडथळा; पोलीस तैनात करण्याची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळ-संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळेस लोकलच्या दारात उभे राहून अर्धा दरवाजा काही महिला अडवीत असल्याने डब्यात शिरताना महिलांची भांडणे होत असल्याचे चित्र दररोज महिला डब्यात दिसते. गर्दीच्या वेळेस या अडचणी समजून घेतल्या तरी गर्दी नसतानाही महिला लोकलच्या डब्यात बसकण मांडत असल्याने आता एका नव्याच समस्येला महिलांना तोंड द्यावे लागत आहे.

उकाडय़ामुळे हैराण झालेले महिला प्रवासी डबा पूर्ण मोकळा असतानाही दारात बसकण मांडत आहेत. रेल्वे स्थानक आले तरी त्या जागेवरून हलत नसल्याने स्थानकावरील महिला प्रवाशांना डब्यात चढताना कसरत करावी लागते. कोपर, दिवा स्थानकातील महिलांना हे दिव्य रोजच पार करावे लागत आहे.

नोकरीनिमित्त कल्याण, डोंबिवली, दिवा येथून मुंबईला जाणारा चाकरमानी वर्ग जास्त आहे. वाहतुकीसाठी इतर पर्याय उपलब्ध नसल्याने हे प्रवासी लोकलचाच वापर करतात. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून कल्याण, डोंबिवली, दिवा हे स्थानके सर्वात गर्दीची स्थानके आहेत. सकाळी गर्दीच्या वेळेस ठाणे स्थानकात उतरणाऱ्या महिला या लोकलचा अर्धा दरवाजा अडवीत असल्याने कोपर व दिवा स्थानकातील महिलांना गाडीत चढताना मोठी कसरत करावी लागते. सकाळची गर्दी पाहता नोकरदार महिलाच केवळ घराच्या बाहेर पडणे पसंत करतात. संपूर्ण कुटुंबाला घेऊन प्रवास करायचा असेल किंवा रोजचा प्रवासाचा अनुभव नसलेल्या महिला या सकाळची गर्दी टाळून दुपारी प्रवास करणे पसंत करतात. परंतु त्यांनाही लोकलच्या डब्यात चढता- उतरताना मोठी कसरत करावी लागते. काही महिला प्रवासी लोकलच्या दारात बसकण मांडतात. उन्हाचा तडाखा वाढला असल्याने डब्यातही गरम हवेच्या झळा मारतात. त्यामुळे महिला या दारात बसणे पसंत करतात.

कल्याण येथून गाडी सुटल्यानंतर महिला ठाणे दिशेला येणाऱ्या दरवाजामध्ये बसतात. या महिलांमुळे कोपर व दिवा स्थानकात चढणाऱ्या महिलांना चढताना त्रास होतो. या महिलांना इतर प्रवाशांनी उठण्यास सांगितले तरी त्या उठत नाही. ठाणे स्थानक आल्याशिवाय या महिला काही उठत नाही. मुंबईला जाणाऱ्या महिला तर ठाणे स्थानक आल्यावरही उतरत नाहीत. दुसऱ्या बाजूने उतरा, दुपारी गर्दी कुठे असते तुम्हाला उतरता येईल, असे उत्तर सांगून त्या मोकळ्या होतात.

दादागिरीत वाढ

महिलांची ही दादागिरी वाढत असून इतर माहिलांना याचा त्रास होत आहे. या महिलांना रेल्वे पोलिसांनी अटकाव करावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत. रेल्वे स्थानकांवर महिला डब्याजवळ एक रेल्वे पोलीस किंवा आरपीएफ जवान तैनात ठेवावे. ज्या महिला दार अडवून उभ्या आहेत किंवा दारात बसलेल्या आहेत, त्यांना हे जवान दारातून हटवू शकतात, असे प्रवासी काव्या वीरकर यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies compartment in local kopar diva
First published on: 19-05-2017 at 01:52 IST