अंबरनाथ येथील बुवापाडा परिसरात रस्त्यावर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी गेलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर सोमवारी सायंकाळी भूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला असून पालिकेच्या गाडीचीही मोडतोड करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बुवापाडा भागात रस्त्याला लागून एका अनधिकृत गाळ्याचे बांधकाम सुरू होते. हे बांधकाम थांबवण्याची सूचना देण्यासाठी पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक सोमवारी तेथे गेले होते. त्यावेळी हा गाळा बांधणारा कन्हैय्या यादव (२६) याने लोखंडी पाईप, सिमेंटच्या विटा आणि दगडांच्या सहाय्याने पथकावर हल्ला केला. यात पालिकेचे कर्मचारी आनंद भिवाळ यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर श्याम जाधव यांना मारहाण करण्यात आली. अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख श्रीकांत निकुळे आणि संदीप कांबळे यांनी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात धाव घेत या भूमाफियांच्या विरोधात तक्रार दाखल केली.