कल्याण : कल्याणमधील पत्रीपूल भागातील नेतिवली टेकडी जय भवानी नगर भागात सोमवारी दुपारी मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. दरडीमुळे चार घरांचे नुकसान झाले. ही घरे बंद असल्यामुळे जीवित हानी झाली नाही. या घर परिसरातील इतर रहिवाशांना धोका टाळण्याठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिकेच्या नेतिवली येथील शाळेत तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केले आहे.

दरवर्षी मुसळधार पाऊस सुरू असला की नेतिवली टेकडीचा भाग खचून या भागातील झोपड्यांचे नुकसान होते. गेल्या महिन्यात या भागात चाळीचा पाठीमागील भाग खचून सहा खोल्यांचे नुकसान झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नेतिवली टेकडीवरील जय भवानी नगर भागातील टेकडीचा काही भाग सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान अचानक खचला. टेकडीचा भाग खचताच त्याला आधार असलेली दगड,गोट्यांची दरड अचानक कोसळली. या दरडीचा भाग तीन ते चार झोपड्यांवर येऊन कोसळला. या झोपड्यांमधील रहिवासी कामानिमित्त घराबाहेर असल्याने सुदैवाने बचावले.

पालिकेच्या आपत्कालीन विभागाला ही माहिती मिळताच उपायुक्त संजय जाधव, साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरड कोसळलेल्या भागाचा काही उर्वरित भाग संततधार पावसामुळे कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जय भवानी नगर भागातील काही रहिवाशांना पालिकेच्या नेतिवली येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. पालिकेकडून या रहिवाशांची निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले.नेतिवली टेकडी ही सरकारी, वन जमिनीचा भाग आहे. या टेकडीवर काही राजकीय मंडळींचा मोठा मतदार आहे. त्यामुळे टेकडीवर दरवर्षी नवनवीन बेकायदा झोपड्या, चाळींची बांधकामे होत असताना राजकीय आशीर्वादामुळे पालिका अधिकाऱ्यांना या बेकायदा झोपड्यांवर कारवाई करता येत नाही.

मुंबईतून हटविलेले बहुतांशी झोपड्यांमधील रहिवासी या भागात स्थलांतरित झाले आहेत. दरवर्षी वीस ते पंचविस झोपड्या या भागात वाढतात असे स्थानिक सांगतात. या रहिवाशांचा रहिवास सुरू झाला की त्यांना तात्काळ पालिकेकडून पाणी, पायवाट, विद्युत वाहिनीची व्यवस्था स्थानिक मध्यस्थ करून देतात. कल्याण शहराच्या प्रवेशव्दारावरची एक भूषण असलेली टेकडी बेकायदा बांधकामांच्या विळख्यात चालली आहे. याविषयी पालिका प्रशासनाकडून, स्थानिक राजकीय मंडळींकडून कोणतीही आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. या टेकडीवर भुयार आहे.