२५ ऑगस्टपर्यंत काम पुर्ण केले नाहीतर ठेकेदारावर होणार कारवाई
ठाणे : नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी कळवा खाडीवर उभारण्यात आलेला नवीन तिसरा पुल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपुर्वी केली असतानाच, आता ठाणे महापालिकेने या पुलाचे काम महिनाभरात उरकून तो वाहतूकीसाठी खुला करण्याची तयारी सुरु केली आहे. या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणे-बेलापूर रोड या एका मर्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदाराला दिले असून त्याचबरोबर या वेळेत काम पुर्ण झाले नाहीतर कारवाईचा इशाराही दिला आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत कळवा नवीन खाडी पुलाची एक मार्गिका खुली होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी दोन खाडी पुल आहेत. त्यापैकी एक ब्रिटीशकालीन असून तो धोकादायक झाल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. दुसऱ्या पुलावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी तिसरा खाडी पुल उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या पुलाच्या कामाची मुदत होती. त्यानंतर डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या ना त्या कारणाने पुलाचे काम रखडत होते. त्यात करोना टाळेबंदीमुळे पूल उभारणीची कामे रखडले. त्यानंतर विविध कर वसुलीवर परिणाम झाल्याने पालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते. यामुुळे शहरात सुरु असलेले कळवा खाडी पुल तसेच इतर प्रकल्प रखडण्याची भिती व्यक्त होत होती. परंतु पालिकेने टप्प्याटप्प्याने त्यासाठी निधी उपलब्ध करून देत हे काम सुरुच ठेवले होते. जून २०२२ पर्यंत पुलाच्या कामाची मुदत संपली तरी त्याचे काम पुर्ण झालेले नाही. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांना नुकतेच एक पत्र दिले होते. कळव्यात कुठल्याही रस्त्यावर खड्डे नसल्याने तिथे प्रवासात अडचण येत नाही, पण, ठाण्याला जाण्यासाठी कळवा पूल ओलांतान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, असे सांगत या कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी कळवा खाडीवर उभारण्यात आलेला नवीन तिसरा पुल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली होती. असे असतानाच ठाणे महापालिकेने या पुलाचे काम महिनाभरात उरकून तो वाहतूकीसाठी खुला करण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी मंगळवारी या पूलाच्या कामाची पाहणी केली. एकूण २.४० किमी लांबीच्या या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झालेले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणे-बेलापूर रोड या एका मर्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश माळवी यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदाराला दिला आहे. तसेच या वेळेत काम पुर्ण झाले नाहीतर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कारागृह आणि साकेत बाजुकडील पुलाच्या पाथ्याशी रस्ता तयार करण्याचे काम शिल्लक असून त्याचबरोबर इतर छोटी मोठी कामे शिल्लक असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.