|| जयेश सामंत, सागर नरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथमधील जागेसाठी सार्वजनिक उद्यानाच्या आरक्षण बदलाचा ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत प्रस्ताव

ठाणे: अंबरनाथ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी लागणाऱ्या ११ हेक्टर जागेवरील आरक्षण बदलण्यासाठीचा प्रस्ताव एमएमआरडीएच्या येत्या १५२ व्या बैठकीत मांडला जाणार आहे. गेल्या वर्षांत या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर राज्याच्या वैद्यकीय विभागाच्या सचिवांनी अंबरनाथ शहरात नियोजित जागेची पाहणी केली होती. जागेवर सध्या सार्वजनिक उद्यानाचे आरक्षण असून ते बदलून त्याजागी वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे.

आरोग्य सुविधांच्या अभावी अंबरनाथ आणि परिसरातील रुग्णांना पुढील उपचारासाठी ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांमध्ये जाण्यावाचून पर्याय नसतो. येथील उपजिल्हा रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून उभारी घेण्याच्या प्रयत्नात आहे. स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याने मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.

करोनाच्या संकटात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने सुरुवातीला येथे प्रशासन हतबल झाले होते. त्यामुळे अंबरनाथमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी जोर धरत होती. गेल्या वर्षांत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या तत्त्वत: मंजुरी दिली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या आदेशानुसार सह संचालय डॉ. अजय चंदनवाले यांनी शेतकी सोसायटीच्या क्षेत्रातील जागेची पाहणी केली होती.

अंबरनाथ नगरपालिकेने सर्वे क्रमांक १०२ पैकी, १०३ पैकी, १०४, १०६ पैकी  व १६६ पैकी ११ हेक्टर क्षेत्र वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरक्षित करण्याची मागणी केली होती. नियोजन प्राधिकरण असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

मंजुरी मिळताच प्रक्रिया

एमएमआरडीएच्या येत्या सभेत अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि परिसर या अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेतील अंबरनाथ नगर परिषद हद्दीत येणाऱ्या आरक्षण क्र. १८० सार्वजनिक उद्यान हे ११ हेक्टर क्षेत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याकरिता आरक्षित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. आरक्षण बदलाला मंजुरी मिळताच याबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

१०० विद्यार्थी आणि ४३० खाटा

अंबरनाथ येथे होणाऱ्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात १०० विद्यार्थी क्षमता असणार आहे. शिवाय संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हे रुग्णालय झाल्यास ठाणे जिल्ह्यातील एवढय़ा क्षमतेचे पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरणार आहे. त्याचा थेट फायदा सर्वामान्यांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Largest medical college proposal at mmrda meeting akp
First published on: 24-02-2022 at 00:13 IST