कल्याण : शहापूर तालुक्यातील सह्याद्री रांग पर्वत हद्दीतील डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील साकडबाव, खराडे, चांग्याचापाडा, कथोरेपाडा भागात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने भक्ष्याचा माग काढत कथोरे पाड्यात प्रवेश केला. श्वानाची शिकार करण्याचा बिबट्याचा बेत असावा. पण गावात बिबट्याने प्रवेश करताच गावातील श्वानांनी एकाचवेळी मोठ्याने भुंकणे सुरू करून बिबट्यापासून स्वसंरक्षणासाठी पळ काढला.

श्वानांचा माग काढत बिबट्या कथोरे पाड्यातील विविध रस्त्यांवरून घरांच्या आडोशाने कुंपणावरून उड्या मारत फिरत होता. कथोरा पाडा येथील रवींद्र कथोरे यांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सकाळी उठल्यानंंतर नेहमीप्रमाणे रवींद्र कथोरे यांनी सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यावेळी त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास श्वान भुंकत होते. त्यावेळी बिबट्या आपल्या घरासमोरील अंगणात आले असल्याचे आढळले.

साकडबाव, कथोरे पाडा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समजल्यावर कथोरे यांनी ही माहिती डोळखांब वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अजय चव्हाण यांना दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नागरिकांच्या जागृततेसाठी बिबट्यापासून स्वसंरक्षण कसे करावे, रात्रीच्या वेळेत बिबट्याने गावात प्रवेश केला तर घ्यावयाची काळजी. गाई, म्हशी, शेळ्या यांच्या सुरक्षिततेसाठी हे गोधन बांधलेल्या गोठ्याचे दरवाजे रात्रीच्या वेळेत बंदिस्त करावेत. सकाळच्या वेळेत गोधन जंगलात चरायला नेताना गटाने जाणे. संध्याकाळी उशिरापर्यंत जंगलात गोधन चारण्यासाठी न थांबणे, जंगलात गोधन चारत असताना अचानक बिबट्या दिसल्या तर घ्यावयाची काळजी याविषयीचे प्रबोधन सुरू केले आहे.

ग्रामीण भागात भातशेती, नागली, उडीद, भाजीपाला लागवडीची कामे सुरू आहेत. गावाजवळील जंगल परिसरात बहुतांशी शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. अशा परिस्थितीत आता गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळेत जंगल परिसरातील रस्त्यावरून एकट्याने न जाण्याच्या सूचना अधिकारी करत आहेत. कथोरे पाडा भागातील बिबट्या नर जातीचा असून तो तीन वर्ष वयाचा असण्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी काढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोळखांब परिसर हा सह्याद्री डोंगर रांगेच्या पट्ट्यात येतो. जुन्नर, माळशेज घाट, अकोले जिल्ह्यातील भंडारदरा, घाटघर जल विद्युत प्रकल्प, आजोबा डोंगर हा घनदाट जंगलाचा भाग आहे. या भागात मुबलक प्राणी, भक्ष्यांचा वावर असल्याने या भागात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. चार वर्षापूर्वी बिबट्याने डोळखांब भागातील रानविहिर गाव हद्दीतील चार शेळ्या फस्त करून त्यांच्या राखणदारावर हल्ला करून जखमी केले होते. पाच वर्षात कालावधीत बिबट्या मुरबाड, भिवंडी जवळील चिंचवली, कसारा घाट परिसरात आढळला होता. गेल्या पंधरा दिवसात बिबट्याचा वावर डहाणू भागातील कासा, वाडा परिसरात आढळून आला आहे. भक्ष्यासाठी बिबट्या संचार करत रात्रीच्या वेळेत गाव हद्दीत घुसतात, असे वनाधिकाऱ्याने सांगितले.