कल्याण: शहापूर तालुक्यातील (जि.ठाणे) वाशाळा वनपरिक्षेत्र हद्दीतील साकडबाव, कोठारे जंगलात दोन दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला आहे. कोठारे गावातील एका शेतकऱ्याचे गाईचे वासरू गावा जवळील जंगलात बिबट्याने फस्त केले आहे. बिबट्याचा या भागात वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच गावातील एका शेतकऱ्याची शेळी दोन दिवसापासून गायब आहे.

एप्रिलमद्ये साकडबाव गाव जंगला जवळील डोळखांब वनहद्दीतील रानविहारच्या जंगलात बिबट्याने किसन काळूराम खाकर या शेळी पालकावर हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले होते. दोन शेळ्या बिबट्याच्या तावडीत सापडल्याने किसन थोडक्यात बचावला होता. आता पुन्हा साकडबाव, कोठारे सर्वाधिक आदिवासी वस्ती असलेल्या डोंगराळ भागात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. भातसा धरण जंगल खोरे, तानसा अभयारण्याला लागून हा भाग आहे. या भागातून बिबट्या आला असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: विश्लेषण: ठाण्यातील राजकीय समन्वयाचे पर्व इतिहासजमा झालंय? वारंवार संघर्ष का निर्माण होतोय?

वनाधिकारी गस्त
कोठारे गावातील भास्कर दरोडा यांचे गाईचे वासरू नेहमीप्रमाणे घरी आले नाही म्हणून त्यांनी गाव परिसरातील जंगलात शोध घेतला. त्यांना जंगलात वासराचा कोथळा फाडला असल्याचे दिसले. वासराच्या आजुबाजुला मातीत बिबट्याच्या पंजे दिसत होते. मातीमधील ठश्यांवरुन हा बिबट्याचाच असल्याचे निश्चित झाल्यानंतर ही माहिती कोठारे गावचे रहिवासी आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांना ग्रामस्थांनी दिली. आ. दरोडा यांनी तातडीने वाशाळा वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल घोगडे, वनपाल अनिल धारवणे यांना ही माहिती दिली. वनाधिकाऱ्यांनी कोठारे जंगलात येऊन वासरू मेल्याच्या ठिकाणी पाहणी केली. त्यांनाही याठिकाणी बिबट्याचा संचार असल्याचे दिसले. वनाधिकारी घोगडे, वनपाल धारवणे, वनसेवक सचिन पडवळ, महेश निचिते यांनी साकडबाव, कोठारे परिसरातील आदिवासी, वाडी, मुख्य रस्त्यांवर ग्रामस्थांनी बिबट्यापासून घ्यावयाची काळजी याविषयीचे सूचना देणारे फलक लावले आहेत. साकडबाव, कोठारे, बाबरे गाव हद्दीत वन रक्षकांची गस्त वाढविण्यात आली आहे. धसई विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या वन विभागातील कर्मचारी या भागात गस्तीसाठी तैनात करण्यात आले आहेत.

शेतकरी भयभीत
साकडबाव, कोठारे भागातील शेतकऱ्यांनी भातपीक जंगल भागातील माळरानावर खळ्यात ठेवले आहे. मोकाट जनावरांचा उपद्रव नको म्हणून अनेक शेतकरी रात्रीच्या वेळेत या भात पिकाच्या रक्षणासाठी शेतावर जातात. त्यांची बिबट्याच्या संचारामुळे अडचण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम सुरू झाल्याने जंगल भागातील शेतांवर हरभरा, मूग, भाजीपाला लागवड सुरू केली आहे. ही कामे सकाळीच शेतावर जाऊन करावी लागतात. शेत परिसरात बिबट्या दडून बसला असेल या भीतीने दोन दिवसांपासून सकाळच्या वेळेत कोणीही शेतावर जात नाही. गटागटाने शेतकऱी ओरडा करत शेतावर जात आहेत. पशुपालक गाई, म्हशी, शेळ्या बिबट्याच्या भितीने जंगलात चरण्यासाठी न नेता गावा जवळील माळरानावर घेऊन जात आहेत. आदिवासी भागातील अनेक महिला या कालावधीत जंगलात जाऊन वाळलेली लाकडे आणून ती गाव परिसरात सरपण म्हणून विकतात. आदिवासी भागातील शेतकरी जीवन जंगलावर अवलंबून आहे, त्यांची बिबट्या्या संचारामुळे अडचण झाली आहे, असे कोठारे गावचे शेतकरी भास्कर दरोडा यांनी सांगितले.

हेही वाचा: “मच्छर चावला तर राजन विचारे म्हणतील तो मुख्यमंत्र्यांनीच पाठवलाय”; नरेश म्हस्के यांची राजन विचारेंवर टीका

“ कोठारे हे आपले जन्मगाव आहे. या भागात बिबट्याचा संचार वाढला आहे. वनाधिकारी यांची या भागात गस्त वाढविली आहे. शेतकऱ्यांना काळजी घेऊन शेत, जंगल परिसरात जाण्याच्या सूचना केल्या आहेत. ”- दौलत दरोडा , आमदार, शहापूर

“ साकडबाव, कोठारे हद्दीत शेतकऱ्यांना बिबट्याची चाहूल लागली तर तात्काळ वनाधिकाऱ्यांना कळविण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या शेतकऱ्याचे वासरू बिबट्याने फस्त केले. त्यांना भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.”- प्रकाश खोडका, तालुका सचिव, श्रमजीवी संघटना, शहापूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“साकडबाव हद्दीत बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेऊन परिसरात वावर ठेवावा. रात्रीच्या वेळेत घर, पशुधन असलेल्या घर, गोठ्याचे दरवाजे काळजीपूर्वक बंद करावेत. बिबट्यापासून नागरी वस्तीला धोका होणार नाही याची वनविभागाकडून घेतली जात आहे.” – विशाल घोगडे, विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी