मुंबई शहरात पसरलेल्या लेप्टोस्पायरोसिसच्या साथीमुळे १४ जणांचा मृत्यू झाला असतानाच ठाणे शहरात मात्र लेप्टोस्पायरोसिसची साथ आटोक्यात असल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अहवालानुसार गेल्या महिन्यात शहरामध्ये लेप्टोचा एकच रुग्ण आढळला आहे. मात्र गेल्या महिन्यात शहरामध्ये मलेरियाचे ११४, तर डेंग्यूचे १२ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठोस पावले उचलल्याने साथीचे आजार नियंत्रणात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरामध्ये लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरली असून आतापर्यंत लेप्टोचे ८६ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सुमारे ३५ रुग्णांना लेप्टोची लागण झाल्याचे निश्चित झाले असून या साथीमुळे आतापर्यंत बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे. असे
असले तरी मुंबई शहराला खेटून असलेल्या ठाणे शहरामध्ये मात्र लेप्टोची साथ आटोक्यात असल्याचे चित्र आहे.
जून महिन्यात शहरामध्ये लेप्टोचा एकच रुग्ण आढळला असून त्यानंतर लेप्टोचा एकही रुग्ण शहरात सापडलेला नाही, असे महापालिकेच्या वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.

पालिकेचा आरोग्य कार्यक्रम
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वीच ठोस पावले उचलली आहेत.
शहरातील २५ आरोग्य केंद्रांतील २५ डॉक्टर आणि ११० पारिचारिका आदींचा चमू साथरोग आटोक्यात ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
गॅरेज आणि बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलेरियाच्या रुग्णांत वाढ
जानेवारी ते मे या कालावधी ठाणे शहरामध्ये मलेरियाचे ४३७ रुग्ण आढळले असून त्यापैकी ११४ रुग्ण जून महिन्यात सापडले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत मलेरियाच्या रुग्णांचा आकडा ५७६ इतका होता. तसेच यंदाच्या जून महिन्यात डेंग्यूचे १२ संशयित रुग्ण आढळले असून गेल्या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा ४११ होता, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.