बारवी धरणात अवघा ३८ टक्के, तर आंद्रा धरणात २६ टक्के पाणीसाठा
बदलापूर : राज्य शासनाने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे नागरी पाण्याचा वापर गेल्या महिनाभरात वाढला आहे. मात्र जिल्ह्य़ाची तहान भागवणाऱ्या बारवी धरण आणि आंद्रा धरणातला पाणीसाठा गेल्या वर्षांच्या तुलनेत कमी असल्याचे समोर आले आहे. सध्या बारवी धरणात अवघा ३८.०९ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षांत हाच पाणीसाठी ४७ टक्के होता. आंद्रा धरणाचा पाणीसाठाही गेल्या वर्षी ४६ टक्के होता, तर यंदा तो २६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरण आणि आंद्रा धरणाची पाणी पातळी गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा कमी झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी टाळेबंदी असल्याने नागरी पाण्याचा वापर वाढला होता. त्याच वेळी औद्योगिक वसाहतीत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या वगळता इतर कंपन्या बंद असल्याने पाण्याचा वापर मर्यादित होता. मात्र या वर्षी उद्योग क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यात टाळेबंदी असल्याने नागरी पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा कमी असल्याचे दिसून आले आहे.
बारवी धरणाची उंची सध्या ७२.६० मीटर आहे. दोन वर्षांपूर्वी पाण्याचा नवा साठा ३४० दशलक्ष घनमीटपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे जिल्ह्य़ाला अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले. मात्र सध्याची पाणी पातळी ही ६२.१६ मीटपर्यंत खाली आली आहे. धरणात सध्याच्या घडीला १२९.०४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. सध्याच्या घडीला धरणात ३८.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षांत हीच पातळी ६४.३४ मीटर होती. तर हा साठा गेल्या वर्षांत १५९.७४ दशलक्ष घनमीटर होता, तर पाण्याची टक्केवारी ४७.१४ होती. त्यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा धरणात ११ टक्के कमी पाणीसाठा आहे.
आंद्रा धरणातही सध्या ८८.९२ दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध आहे. हा साठा अवघा २६.२१ टक्के आहे. गेल्या वर्षांत आंद्रा धरणातील पाणीसाठा १५९.१९ दशलक्ष मीटर म्हणजे तब्बल ४६.९५ टक्के होता.
पाणीसंकट गडद होण्याची शक्यता
पाटबंधारे विभागाने जानेवारी महिन्यात दर पंधरा दिवसांनी एकदा तांत्रिक दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा २४ तास बंद करण्याचे सुचवले होते. मात्र टाळेबंदींमुळे त्याची अंमलबजावणी केली जात नाही. येत्या काळात पाण्याचा वापर असाच सुरू राहिल्यास पाणीसंकट गडद होण्याची शक्यता आहे.