अलीकडेच जीवन विम्याचा १५वा हप्ता भरून आल्यावर आता पुढच्या वर्षीचा हप्ता शेवटचाच. मग पॉलिसीची संपूर्ण रक्कम आपल्या हाती येईल, असे मनातल्या मनात खुशीत गाजर खात असतानाच घरातला दूरध्वनी खणखणला. ‘किशोर सालवीजी सुप्रभात..मैं एलआयसी दिल्ली ऑफिस से बोल रही हू’ हे शब्द कानी पडताच आधी मी आनंदित झालो. ‘आपने अभी तक अपना बोनस क्लेम किया नही, इसिलिए आपकी फाइल हेडऑफिस आयी है. आप के एजंट या एलआयसी कार्यालयने इस के बारे में कुछ नही बताया क्या?’ मी भोळसटपणे नाही म्हणालो. त्यावर तिने माझे नाव आणि एलआयसी पॉलिसीचा नंबर विचारला. त्याचक्षणी मी भानावर आलो. माझ्या पॉलिसीची संपूर्ण फाइलच जर तिकडे आहे, तर नाव, नंबर विचारण्याचे प्रयोजन काय? माझ्या मनातील शंका मी विचारली. त्यावर तुमची पूर्ण माहिती मिळाल्यावरच मी अधिक तपशील सांगेन, असे तिने सराईतपणे सांगितले. मीसुद्धा सरकारी कामातील गोपनीयतेचे महत्त्व जाणून एजंटला विचारून सांगतो, असे उत्तर दिले.
मी लगेच तत्परतेने एजंटला फोन केला. त्याने मला सर्वच पॉलिसींवर बोनस नसतो, अशी माहिती दिली. अधिक माहितीसाठी कार्यालयात मुख्य एजंटला भेटायला सांगितले. मी एका कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी एलआयसी कार्यालयात गेलो. तिथे बराच काळ घालविल्यानंतर अखेर माझी पॉलिसी मिळाली. त्यावर कोणताही बोनसवगैरे नसल्याचेही समजले. दिल्ली कार्यालयाचे नाव सांगून असे फोन आले तर कोणतीही माहिती देऊ नका असे सांगितले. एलआयसीसारख्या विश्वासार्ह कंपनीकडून दूरध्वनी आल्यावर ग्राहक फसू शकतात. त्यानंतर काही दिवसांनी रीतसर एलआयसीकडून अशा प्रकारचे दूरध्वनी बोगस असून ग्राहकांनी पॉलिसीबाबत कोणतीही माहिती देऊ नये, अशा आशयाचे एसएमएस आले. तरीही बऱ्याच जणांना ही बनवाबनवी अजूनही ठाऊक नाही. याबाबतीत लोकांनी सर्तक व्हावे, म्हणून माझा अनुभव दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2015 रोजी प्रकाशित
जीवन विम्याच्या बोनसची ‘पॉलिसी’
अलीकडेच जीवन विम्याचा १५वा हप्ता भरून आल्यावर आता पुढच्या वर्षीचा हप्ता शेवटचाच. मग पॉलिसीची संपूर्ण रक्कम आपल्या हाती येईल, असे मनातल्या मनात खुशीत गाजर खात असतानाच घरातला दूरध्वनी खणखणला.
First published on: 11-03-2015 at 08:06 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life insurance