ठाणे : गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची आता लगबग सुरु झाली असताना, दिवा सावंतवाडी रेल्वेगाडीत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या रेल्वेगाडीमध्ये तब्बल दारूने भरलेले ३४ कॅन आढळून आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सध्या दिसत आहे. मुंबईसह ठाणे, पालघर परिसरातील हजारो प्रवासी दरवर्षीप्रमाणे कोकणात जाण्यासाठी रेल्वेचा मार्गाने प्रवास करतात. दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या स्थानकातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची नेहमी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्यासोबतच सुरक्षा यंत्रणाही अधिक सतर्क केली आहे.
याच दरम्यान, दिवा–सावंतवाडी रेल्वेगाडीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गाडीत तपासणीदरम्यान दारूने भरलेले तब्बल ३४ कॅन आढळून आले. ही घटना समजताच रेल्वेतील प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत त्वरित कारवाई केली.
प्रकरण नेमके काय आहे ?
दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक आठवर रविवारी आरपीएफचे जवान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सावंतवाडी-दिवा रेल्वे पॅसेंजर आली. आरपीएफचे हवालदार कमलेश श्रीवास्तव आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएफएस) प्रभाकर महाजन रेल्वेगाडीत शिरले. त्यांनी रेल्वे डबे तपासल्यानंतर दरवाजा बंद करत असताना दोन बेवारस गोण्या त्यांना आढळून आल्या. आरपीएफचे इतर कर्मचारी डब्यामध्ये दाखल झाले. त्यांनी सर्व प्रवाशांना गोण्यांबाबत विचारले असता, कोणीही त्या गोण्या आमच्या असल्याचे म्हटले नाही. आरपीएफच्या जवानांनी गोण्या उघडून पाहिल्या असता, एका गोणीमध्ये १६ आणि दुसऱ्या गोणीत १८ दारूचे कॅन आढळून आले.
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा –
या दोन्ही गोण्यांमध्ये एकूण ३४ दारूचे कॅन आढळून आल्यानंतर आरपीएफचे हवालदार कमलेश श्रीवास्तव यांनी तात्काळ ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. तेथे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.