रोजचा डाळभात कुणाला चुकला नाही. अर्थात या घरच्या अन्नाला तोडही नाही. मात्र कधीतरी महिना-पंधरा दिवसांनी रुचीपालट म्हणून बाहेरचे खावेसे वाटते. त्यातूनच मग दर महिन्याला नवा खाऊअड्डा शोधला जातो. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असणाऱ्या ठाण्यात खवैय्यांसाठी अनेक नवे पर्याय उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस त्यात काही नव्यांची भरही पडत असते. वेगळ्या धाटणीच्या पदार्थासाठी सध्या ठाण्यात ‘लिटिल बाइट’ हा कॉर्नर बराच लोकप्रिय आहे. विनोद अग्रवाल यांनी वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या या खाऊअड्डय़ावर पावभाजी, तवा पुलाव, भेळपुरी, पाणीपुरी, निरनिराळ्या प्रकारचे चाट, सँडविच असे तब्बल १३० प्रकार नव्या चवींसह उपलब्ध आहेत.

पावभाजी आणि तवा पुलाव हे तर ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी मिळतात. खडा पावभाजी, चीज पावभाजी, बटर पावभाजी असे विविध प्रकार उपलब्ध असताना आपल्याला पावभाजीत अजून कुठली वेगळ्या धाटणीची चव चाखायला मिळणार असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र ‘लिटिल बाइट’ मध्ये मुंबई तडका ग्रील पावभाजी मिळते. ग्रिल्ड पाव आणि त्याबरोबर तडका टाकून केलेली झणझणीत भाजी एकदम झक्कास. त्याचबरोबर येथे आपल्याला पनीर पावभाजी, मश्रुम पावभाजी, जैन पावभाजीचीही चव चाखायला मिळते. लिटिल बाइट कॉर्नरचे वैशिष्टय़ म्हणजे येथील तवा पुलाव. इथे तवा पुलाव हा पावभाजीच्याच तव्यामध्ये चायनीजच्या भाज्या आणि पावभाजी मसाला टाकून तयार केला जातो. त्यामुळे एकाच वेळी आपल्याला दोन मिश्र चवींचा आस्वाद घेता येतो. चीज तवा पुलाव, पनीर तवा पुलाव, तवा पुलावमध्ये काजू टाकून तयार केलेला शाही काजू पुलावही येथे उपलब्ध आहेत.

प्रारंभक अथवा स्टार्टर्स हे आता कोणत्याही मेजवानीचे अविभाज्य घटक असतात. ऑर्डर केलेला मुख्य बेत येईपर्यंत तोंडी लावण्यासाठी प्रारंभक उपयोगी ठरतात. बहुतेकदा प्रारंभक म्हणून मसाला पापड मागविला जातो. इथेही आपल्याला मसाला पापड, चाट पापड, तिखट चवीची पापड चुरी, मसाला पापडावर चीज टाकून केलेला मसाला चीज पापडाची चव चाखायला मिळते. पाणीपुरी, दही भेळपुरी, शेवपुरी, दही आलू चाट, दही, शेवपुरीची पुरी कुस्करून दही, कांदा, टॉमॅटो, तिखट- गोड चटणी टाकून तयार केलेली दही पापडी म्हणजे प्रारंभकांची लाजवाब मेजवानीच.

सॅण्डविच, पिझ्झा, हॉट डॉग अशा काही पाश्चिमात्य पदार्थाशिवाय हल्ली बहुतेक कॉनर्सचे मेन्यूकार्ड पूर्णच होत नाहीत. त्याचबरोबर टोस्ट सॅण्डविच, रशियन सॅण्डविच, शेजवान पिझ्झा, चीज पनीर पिझ्झा, हॉट डॉग हे दररोजच्या चवीचे पदार्थ तर आपण सगळीकडेच खातो. मात्र त्यातही इथे वेगळे प्रकार आहेत. त्यातलाच एक म्हणजे हॉट डॉग. ब्रेडमध्ये व्हेज खिमा, चीज अद्रक लसूण पेस्ट , मिरची मसाल्याचं मिश्रण अशी बेमालूम भट्टी जमून येते की काही विचारूच नका. कांद्याचे विविध पदार्थ आवडणाऱ्यांसाठी इथे चीज ओनियन रोल आहे. ओपन ब्रेडवर मका, पनीर, कोबी, लिटिल बाइट स्पेशल मसाला, मेयॉनीज यांचं मिश्रण टाकून तयार केलेलं पनीर चीज लसुनी टोस्ट, तिखट आणि चीझी पदार्थ आवडणाऱ्यांसाठी चिझी चटका अशा काही नावीन्यपूर्ण पदार्थाची चव आपल्याला इथे चाखायला मिळते.

ऋतू कोणताही असो ज्यूस, मिल्कशेक, ब्लॉसम, फालुदासारखी शीतपेय आपल्याला तहान भागवण्यासाठी लागतातच. टॉमॅटोचे सार किंवा सूप तर आपण आठवडय़ातून एकदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीतच असतो. इथे मात्र टॉमॅटो ज्यूस, ग्रेप्स ज्यूस, कॉकटेल ज्यूस आणि सर्वाचे आवडते ऑल टाइम फेव्हरेट लिंबू असे विविध प्रकारचे ज्यूस उपलब्ध आहेत. मिल्कशेकमध्ये रोझ, चिकू, मँगो,चॉकलेट अशा काही दररोजच्या चवींचे मिल्कशेक घेऊन कंटाळला असाल तर येथील ड्राय अंजीर मिल्कशेक, ड्राय फ्रुट मिल्क शेक, काजू-अंजीर मिल्क शेक असे चवीष्ट आणि पौष्टिक पर्याय उपलब्ध आहेत. फळांच्या रसात व्हॅनिला टाकून केलेला ब्लॉसम असो वा मस्त दूध, शेवया, आईसक्रीम, फळांचा रस टाकून केलेला फालुदा. दोन्हीही आपली आवडती पेय. इथे आपल्याला रॉयल फालुदा, केसर फालुदा, ऑरेंज फालुदा, मोसंबी ब्लॉसम, ग्रेप्स ब्लॉसम, वॉटर मेलन ब्लॉसम असे काही वेगळ्या चवींचे फालुदा आणि ब्लॉसम उपलब्ध आहेत.

  • लिटिल बाइट कॉर्नर, २, विनोद सोसायटी, चरई, ठाणे (प.) .