कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर येथे पालिकेतर्फे पंपिंग केंद्र उभारणीचे काम अहमदाबाद येथील मेसर्स एल. सी. इन्फ्रा कंपनीतर्फे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्याच्या मुख्य सचिवांच्या देखरेखीखाली कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन विहित वेळेत हे काम पूर्ण करून घेत आहे. केंद्र उभारणीची जागा ही आमच्या मालकीची आहे. या केंद्रामुळे या भागात अडचणी उभ्या राहतील, असे प्रश्न उपस्थित करीत शनिवारी वाडेघर येथील काही जमीनमालकांनी संघटितपणे केंद्राच्या ठिकाणी पर्यवेक्षक असलेल्या अभियंत्याला मारहाण केली.

खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून १२ सेक्टरमध्ये ८२ किमी लांबीची मलवाहिनी टाकणे, १४ पंपिंग केंद्र उभारणे, १४ किलोमीटर लांबीची मुख्य केंद्राला जोडणारी वाहिनी टाकण्याची कामे करायची आहेत. परिसरातील इमारतींच्या मल टाक्या मलवाहिन्यांना जोडण्याची कामे अहमदाबाद येथील मे. एल. सी. इन्फ्रा कंपनीला पालिकेकडून देण्यात आली आहेत. हे काम ७२ टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०२१ पर्यंत ते पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे आदेश आहेत. उल्हास नदी प्रदूषणासंदर्भात वनशक्ती विरोधात कल्याण-डोंबिवली पालिकेचा दावा सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या दाव्याच्या अनुषंगाने उदंचन केंद्राचे काम विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामावर राज्याच्या मुख्य सचिवांची देखरेख आहे. असे असताना स्थानिक भूमिपुत्र वाडेघर येथील उदंचन केंद्राच्या कामात अडथळे आणून हे काम रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे विकास कामांवर विपरीत परिणाम होतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी रस्ते, गटारे, पदपथ, शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट केंद्र उभारणी करताना टिटवाळा, बारावे, उंबर्डे, कोळीवली, कचोरे, चोळे, खंबाळपाडा, कोपर भागात भूमिपुत्रांनी पालिका अधिकारी, ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. भोपर परिसरात भूमिपुत्र जमिनीची मोजणी, भूसंपादन करू देत नसल्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले आहे. या जमिनींवर स्थानिकांनी चाळी, बंगले, इमारती बांधल्या आहेत. बाह्य़वळण रस्त्यात त्या तुटणार असल्याने रहिवाशांना पुढे करून भूमिपुत्र रस्ते विकासकामात अडथळे आणत आहेत.