कल्याण-डोंबिवली दरम्यानची लोकलसेवा आज चार तास बंद; १२४ लोकल, १६ लांबपल्ल्याच्या गाडय़ा रद्द

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : नाताळची सुट्टी असल्याचे निमित्त साधत मध्य रेल्वेने बुधवारी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या मेगा ब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने कल्याण ते कर्जत-कसारा, सीएसएमटी ते डोंबिवली, ठाणे-डोंबिवली दरम्यान २० मिनिटाच्या अंतराने विशेष लोकल सेवा सुरू ठेवली आहे. मात्र नाताळच्या सुट्टीचा मुहूर्त साधून मुंबई, ठाण्यात फिरायला जाणाऱ्यांसाठी हा मेगा ब्लॉक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पूल बांधून तयार आहे. या पुलावर सहा मीटर लांबीचे चार गर्डर शक्तिशाली क्रेनच्या साहाय्याने ठेवण्यात येणार आहेत. हे काम बुधवारी सकाळी पावणेदहा ते दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. विनाअडथळा हे काम पूर्ण व्हावे यासाठी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी सव्वानऊ ते दुपारी दुपारी पावणेदोन कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे १२४ लोकल, १६ लांब पल्ल्याच्या गाडय़ा चार तासांच्या अवधीत रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मेगा ब्लॉकच्या काळात ८७ विशेष लोकल कल्याण ते कर्जत-कसारा आणि सीएसएमटी ते डोंबिवली दरम्यान सोडण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाडय़ा दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळविण्यात येणार आहेत. नाताळ सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने केडीएमटी प्रशासनाला विशेष बस सोडण्याची मागणी केली आहे. ठाणे-सीएसएमटी लोकल सेवा त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस

’ कोल्हापूर-सीएसएमटी सह्य़ाद्री, भुसावळ पॅसेंजर, पुणे सिंहगड, मनमाड राज्यराणी, डेक्कन क्वीन, पंचवटी, दादर-जालना जनशताब्दी.

’ एलटीटी-हजूर साहिब, नागरकोईल, हैदराबाद एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जत मार्गे सोडण्यात येणार आहे.

’ कल्याणहून नाशिकडे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाडय़ा दिवा रेल्वे स्थानकादरम्यान थांबविण्यात येणार आहेत.

केडीएमटीची बससेवा

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत विशेष वाढीव २० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीत बाजीप्रभू चौक येथून बसचे संचालन करण्यासाठी विशेष अधिकारी, पर्यवेक्षक वर्ग तैनात करण्यात आला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक येथेही बस थांबा ठेवण्यात आला आहे. बस प्रवाशांनी भरेल त्याप्रमाणे या बस सोडण्यात येणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train between kalyan dombivli closed for four hours zws
First published on: 25-12-2019 at 02:37 IST