आम्ही हाजुरी दर्गा रोड, आयुर्विमा कार्यालयाजवळील श्रीष सोसायटीत राहतो. महापालिकेने आयुर्विमा कार्यालयाजवळील सेवा रस्त्यावर उत्तम जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. मात्र सेवा रस्त्यालगतचे काही हॉटेल्सचालक त्या ट्रॅकवर बिनदिक्कतपणे कचरा टाकतात. त्यात सडलेल्या खाद्यपदार्थाचाही समावेश असतो. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना येथे नाक मुठीत धरावे लागते. या संदर्भात आम्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या, पण त्यांची साधी दखल घेण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही. वास्तविक हॉटेलमालकांनी जवळच असलेल्या कचराकुंडीचा वापर केला, तर तो सर्व परिसर स्वच्छ राहू शकतो.
आमच्या सोसायटीच्या कोपऱ्यावर (हाजुरी चौक) नागरिक कचरा टाकतात.  त्याविषयीसुद्धा आम्ही सातत्याने तक्रारी केल्या आहेत. जवळच आरटीओ कार्यालय आहे. त्यामुळे तिथे येणाऱ्या वाहनांमुळे हाजुरीच्या कोपऱ्यावर वाहतूक कोंडी होते. वास्तविक ठाणे महापालिकेने या विभागासाठी खारेगाव येथे जागा देऊ केली आहे, मात्र अद्याप आरटीओ तिथे जाण्यास तयार नाही. अशा विविध कारणांमुळे आम्ही या परिसरातील नागरिक त्रस्त आहोत.
(जयश्री जांभेकर, प्रज्ञा रानडे, डॉ. रीटा भिडे, डॉ. शरयू चांदोरकर, संगीता काळे, शोभना गोखले, ज्योती नामजोशी, नीरजा दामले, विद्या म्हैसाळकर, विशाखा पवार आणि इतर, ठाणे)

सॅटीसवर पुन्हा फेरीवाले
ठाणे महापालिकेचे आयुक्त बदलताच रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा त्रास कमी झाल्याचे चित्र सुरुवातीच्या काळात निर्माण झाले होते. आर.ए. राजीव यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा असताना त्यांचा महापालिकेतील कामकाजावर वचक असायचा. रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या गोखले मार्गावरील पदपथांवर एकही फेरीवाला बसू द्यायचा नाही, असा पणच राजीव यांनी केला होता.राजीव यांची बदली झाली आणि हे चित्र बदलले. असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात सॅटीस, गोखले मार्गावर सर्वत्र फेरीवाल्यांचे जथ्थेच्या जथ्थे नजरेस पडायचे. संजीव जयस्वाल यांनी मात्र आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच सॅटीसची वाट ठाणेकरांसाठी मोकळी करून दिली. हे निश्चितच स्वागतार्ह म्हणायला हवे. जयस्वाल यांच्या कामाची दिशा यामुळे स्पष्ट होत असली तरी महापालिकेचे प्रभाग अधिकारी त्यांना किती दाद देतात हे पाहावे लागेल, कारण जयस्वाल यांच्या दणक्यानंतरही काही दिवसांत सॅटीसवर पुन्हा फेरीवाले दिसू लागले आहेत. आयुक्तांच्या आदेशानंतरही प्रभाग अधिकाऱ्यांच्या मुजोरीने किती टोक गाठले आहे याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.
– प्रतीक नखाते, पाचपाखाडी.

शरद राव, आहात कुठे?
ठाणे-मुंबईतील ९० टक्के रिक्षावाले मुजोर झाले आहेत. अलीकडे झालेल्या चोरी, बलात्कार इत्यादी घटनांमधून त्यांचे गुन्हे करण्याचे धाडस वाढलेले दिसत आहे, कारण रिक्षाभाडे वाढवून देताना नेहमी गाडीतून फिरणारे शरद राव त्यांच्या पाठीशी उभे राहतात; पण आजपर्यंत जेव्हा जेव्हा याच मुजोर रिक्षावाल्यांनी गुन्हे केले किंवा लोकांच्या असाहाय्यतेचा गरफायदा घेतला तेव्हा शरद रावांनी एकदाही साधी प्रतिक्रियासुद्धा दिली नाही. यावरून शरद रावांच्या असंवेदनशील वर्तनाची चीड येते. तसेच अशा नेत्यांमुळे पुन:पुन्हा गुन्हे करण्यास हे रिक्षावाले धजावतात असे वाटते. म्हणून आता एकदा तरी सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या समस्या (रिक्षासाठी वणवण) आणि सुरक्षा (चोरी, बलात्कार) याविषयी जाणण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न करावा व गुन्हे करणाऱ्या  रिक्षाचालकांना कडक शासन होईल याची खबरदारी घ्यावी, ही अपेक्षा.
प्राजक्ता प्रमोद लिमये, ठाणे</strong>