सुरक्षेच्या काटेकोर नियमांचे काय झाले?
डोंबिवलीत गुरुवारी औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाने नागरिकांनी धरणीकंप अनुभवला. अद्यापही ते या धक्क्य़ातून सावरलेले नाहीत. भविष्यात अशा दुर्घटनांपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी अक्षरश: टाहो फोडला आहे.
सुरक्षा संभाळा
गुरुवारी रिक्षामध्ये बसतानाच प्रचंड आवाजाने रिक्षाची काच फुटून माझ्या मांडीवर पडली. त्या वेळी बाजूची इमारत पडते की काय, असे वाटले. शहरात औद्योगिक क्षेत्र असल्याने रहिवाशांना प्रदूषणाला सामोरे जावे लागते. स्फोट तर भयकारीच होता, म्हणूनच सरकारने सुरक्षेचा गांभीर्याने विचार करावा.
– सुयश देसाई, डोंबिवली.
परवानग्या दिल्याच कशा?
डोंबिवलीमधील औद्योगिक परिसरात रासायनिक कंपन्यांना सर्रास परवानग्या दिल्या जातात. केमिकल कंपनी, त्या कंपनीला परवानगी देणारे अधिकारी की महापालिका, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने कंपन्यांना परवानगी देण्याआधी विचार करणे गरजेचे होते. केमिकल कंपन्यांची ताबडतोब हकालपट्टी करून आता तरी प्रशासनाने नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे.
– नीलेश काळे, डोंबिवली.
रासायनिक क्षेत्र तातडीने हलवावे
स्फोटाच्या घटनेनंतर रात्रीही भीतीचे वातावरण होते. त्याचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर झाला आहे. डोंबिवलीत नागरी वसाहती उद्योगांच्या अगदी मुखापर्यंत गेल्या आहेत. येथील रहिवासी त्वचा व श्वसनांच्या आजाराने आधीच त्रस्त होते. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.
– मंगेश कोयंडे, डोंबिवली.
रहिवाशांना धोका
गुरुवारी घडलेली घटना ही आम्हा एमआयडीसी परिसरातील रहिवाशांना कधीही विसरता येणार नाही. आता या कंपन्या येथील नागरिकांचा जीव घेतील की काय, अशी भीती वाटू लागली आहे. केमिकल कंपन्यांकडून नद्यांमध्ये सर्रासपणे सोडले जाणारे सांडपाणी, रात्रीच्यावेळी करण्यात येणारे प्रदूषण या सर्व समस्यांशी लढा देत असताना आता एवढी मोठी घटना घडली. या घटनेला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होतो. – कृतिका सावंत, डोंबिवली
काटेकोर तपासणी हवी
ज्यांच्या निष्काळजीपणामुळे ही भयंकर घटना घडली असेल त्यांच्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई करणे आवश्यक आहे. भविष्यात यासारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने प्रत्येक कंपनीत काटेकोर तपासणी करायला हवी. सुरक्षेच्या बाबतीत कंपनी मालकांनी आणि प्रशासनाने जागरूक राहणे गरजेचे आहे.
– नितीन पागी, कल्याण</strong>
प्रदूषणमुक्त परिसर हवा
डोंबिवली औद्योगिक परिसरातील कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक धुरामुळे हा परिसर कायम प्रदूषणाच्या छायेत असतो. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता कंपनी परिसर नागरिकांसाठी अतिशय घातक ठरतो. औद्योगिक परिसरापासून लांब अंतरावर रहिवाशांची सोय असणे आवश्यक आहे.
– देवेंद्र लोहार, कल्याण.