मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार एक लाख कोटी डॉलपर्यंत नेण्यासाठी सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक विकासाचा आणि त्यासाठी पूरक अशा पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा ऊहापोह करण्यासाठी १७ जूनला ठाण्यात ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘एसएमई कॉन्क्लेव्ह २०२२’ होणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन आणि मुंबई शेअर बाजाराच्या लघु व मध्यम उद्योग आणि स्टार्टअप  विभागाचे प्रमुख अजय ठाकूर यांच्यासह ठाण्यातील उद्योग क्षेत्रातील नामांकित उद्योजक या बहुसत्रीय परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत राज्याच्या भविष्यातील औद्योगिक वाटचालीची रूपरेखा मांडली जाईल. त्याचबरोबर राज्यातील पहिल्या औद्योगिक वसाहतीच्या रूपात महाराष्ट्रासमोर औद्योगिक विकासाचे प्रारूप घालून देणाऱ्या ठाण्यातील उद्योग क्षेत्राची वाटचाल, सद्यस्थिती-आव्हाने व त्यावरील उपाययोजना, भविष्यातील विकासाच्या संधी याबाबतही चर्चा होईल. औद्योगिक क्षेत्रातील बदल आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, याची चर्चा या परिषदेत होईल.

देशातील औद्योगिक उत्पादनाच्या १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळपास ४० टक्के महसूल हा महाराष्ट्रातून मिळतो. स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके महाराष्ट्राने विविध उद्योगांच्या विकासाचे सारथ्य केले. अनेक मोठे उद्योग-हजारो लघु व मध्यम उद्योग व त्यात काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह २०२२’च्या माध्यमातून उद्योजक, विश्लेषक, सरकार या विविध घटकांना एकाच व्यासपीठावर आणून महाराष्ट्राच्या भविष्यातील औद्योगिक जडणघडणीवर विचारमंथन होणार आहे.

मुख्य प्रायोजक :महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

सहप्रायोजक : ठाणे भारत सहकारी बँक लि.