ठाणे, डोंबिवली, कल्याणसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी सोडविताना १० ते १२ तास वाहतूक पोलिसांना काम करावे लागते. त्यामुळे कोंडीसह ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा त्रास, ताणतणाव, आरोग्यावरील विपरीत परिणामाचा फटका सेवेला बसत आहे. त्यामुळे पोलिसांचे कामाचे आठ तास केले आहे. घेतलेल्या निर्णयाबाबत व्यक्त करण्यात आलेल्या काही निवडणक प्रतिक्रिया..
पोलिसांच्या हिताचा निर्णय
माझ्या कुटुंबामध्ये पोलीस खात्यात काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण हा आम्ही जवळून अनुभवला आहे. खास करून वाहतूक पोलीस या सर्व प्रकाराला बळी पडतात. रणरणत्या उन्हात, मुसळधार पावसातही ते काम करत असतात. त्यांच्या या कामाची कोणीही दखल घेत नाही. मात्र ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी घेतलेला निर्णय हा पोलिसांसाठी खरोखरच उपयुक्त ठरणार आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करणारे अधिकारी फार कमीच आढळतात.
– आत्माराम जाधव, ठाणे
ताण कमी होईल..
लोकसत्ता ठाणेमधील ‘वाहतूक पोलीस आता ऑन डय़ुटी आठ तास’ हे वृत्त वाचले. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि त्या पल्याडच्या उपनगरांमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत होता. मात्र याचा दुप्पट त्रास हा कोंडी नियंत्रित करणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यालाही होत असेल याचा कोणीही विचार करत नाही. खरे तर या धावपळीच्या जगात माणुसकीचे दर्शन क्वचितच पाहायाला मिळते. मात्र वाहतूक पोलीस उपायुक्तांनी घेतलेला हा निर्णय माणुसकीच्या दृष्टीने आणि पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे आम्हा नागरिकांकडून याला पूर्ण पाठिंबा आहे.
– केतन गोरे, ठाणेकामाचे तास कमी करणे हे चांगलेच..
वाहतूक पोलिसांचे कामाचे तास एका अर्थाने कमी केले हे चांगलेच झाले आहे. त्यामुळे कामाचा प्रचंड ताण त्यांच्यावर पडणार नाही. तसेच जे काम करतील ते लक्षपूर्वक करता येईल. पोलिसांनीही त्यांचे काम समजून केले पाहिजे. जितके तास काम करतील ते चोखपणे करणे अपेक्षित आहे. पोलिसांची कामगिरी महत्त्वाची असते. या पोलिसांना सणवारांनाही सुट्टी नसते. अशातच त्यांचे कामाचे तास कमी केल्याने कुटुंबीयांना त्यांना वेळ देणे शक्य होईल.
– ओमकार तिरोडकर, डोंबिवली
वाहतूक कोंडी कमी होईल अशी आशा..
वाहतूक पोलिसांचे कामाचे तास कमी केले हे एका अर्थाने बरेच झाले. या निर्णयामुळे पोलिसांवरील कामाचा ताण थोडा हलका होणार आहे. आता आठ तासात जितके काम करता येईल तितके त्यांनी झोकून देऊन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा गोंधळ वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. वाहतूक हा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. सध्या अनेक रस्त्यावर वाहतूक पोलिसांमुळेच वाहतूकीची कोंडी होते अशी ओरड आहे. मात्र आता डय़ुटी कमी झाल्याने वाहतूक समस्येवर तोडगा निघेल आणि पलिसांचा ताणही कमी होईल अशी आशा आहे.
– अक्षय सामंत, डोंबिवली
वाहतूक कोंडी न सोडविणाऱ्यांवर वचक बसवा
ठाणे वाहतूक पोलिसांवर येणारा ताण लक्षात घेऊन वरिष्ठांनी त्यांचे कामाचे तास आठ केल्याचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. अनेकदा कर्मचारी कमी असल्याने तसेच कामांच्या वेळा निश्चित नसल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना दहा तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागते. कामाचा ताण आणि बिघडणारे आरोग्य याचा परिणाम कामावर होत असल्याने हा निर्णय वाहतूक विभागाने घेतला असला तरी, ज्या ठिकाणी वाहतूक पोलीस केवळ दंडवसुली करतात वाहतूक कोंडी सोडवीत नाही. त्यांच्यावरही वचक बसवून सर्वाना एक शिस्त लावावी.
– स्नेहा हाटे, डोंबिवली
आता कर्तव्य प्रामाणिकपणे बजवावे
ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या शहरांत वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. वाहतूक पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने वाहतूक विभागाने पोलिसांच्या मदतीला वाहतूक सेवकांची नेमणूक केली. अनेक उपाय करूनही वाहतूक कोंडीची काही समस्या सुटताना दिसत नाही. अपुऱ्या संख्याबळामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे आठ तास वाहतूक विभागाने केली हे नक्कीच कौतुकास्पद आहे; परंतु याची नीट अंमलबजावणी होऊन वाहतूक कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करतील.
– सतीश शिरावले, डोंबिवली.