ठाणे : ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी ठाणे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि धर्मराज्य या पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरून पोलीस आयुक्त कार्यालयावर जनप्रक्षोभ मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि ठाणे पोलीस विरोधात निषेधाचे फलक झळकवत जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात महाविकास आघाडीने शक्तीप्रदर्शन केल्याचे बोलले जाते. ठाणे पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा असल्याने पोलिसांनी पोलीस मुख्यालयाकडे जाणारे सर्व प्रवेशद्वार, रस्ते ठाणे पोलिसांनी अडथळे आणि वाहने उभी करून बंद केले होते.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरेंनी दाढी खाजवत केली एकनाथ शिंदेंची मिमिक्री; सरकारला मदत करणाऱ्या IAS, IPS अधिकाऱ्यांना दिला इशारा, म्हणाले..
या मोर्चामुळे तलावपाळी, स्थानक परिसर, जांभळी नाका, टेंभी नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका प्रवाशांना बसला. सॅटिस पुलावर वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. शाळेच्या बसगड्याही काही काळ कोंडीत अडकल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप तक्रार नोंदवून घेतलेली नसून त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण, ते कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.
ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदान ते ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी दुपारपासून शिवाजी मैदान परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमत होते. तर, काँग्रेसचे कार्यकर्ते परिसरातच असलेल्या जिल्हा कार्यालयात जमले होते. शिवाजी मैदान परिसरात बसगाड्या आणि वाहनांमधून जथ्थे येत होते. यामुळे जांभळी नाका चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली. त्याचा परिणाम तलावपाळी, स्थानक परिसर, जांभळी नाका, टेंभी नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीवर झाला. त्यानंतर शिवाजी मैदान, जिल्हा परीषद कार्यालय, बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, आनंद दिघे शक्तीस्थळ असा मोर्चा निघाला.
हेही वाचा >>> ठाण्यातील मोर्चामुळे वाहतूकीचे तीन तेरा ; सॅटिस पुलावर वाहनाच्या लांब रांगा
मोर्चामध्ये कार्यर्त्यांनी राज्यसरकार आणि शिंदे गटाविरोधातील फलक झळकविले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चा पोलीस आयुक्तालय परिसरात आला असता, पोलिसांनी मुख्यालयाचे सर्व प्रवेशद्वार बंद केली होती. तसेच मुख्यालयाच्या दिशेने जाणारे अंतर्गत रस्ते अडथळे, वाहने उभी करून बंद केली होती. तसेच नागरिकांनाही मुख्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते.
तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील
ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदान ते ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी दुपारपासून शिवाजी मैदान परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमत होते. तर, काँग्रेसचे कार्यकर्ते परिसरातच असलेल्या जिल्हा कार्यालयात जमले होते. शिवाजी मैदान परिसरात बसगाड्या आणि वाहनांमधून जथ्थे येत होते. यामुळे जांभळी नाका चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली. त्याचा परिणाम तलावपाळी, स्थानक परिसर, जांभळी नाका, टेंभी नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीवर झाला. त्यानंतर शिवाजी मैदान, जिल्हा परीषद कार्यालय, बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, आनंद दिघे शक्तीस्थळ असा मोर्चा निघाला. यात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्याचवेळेत याच परिसरातील शाळाही सुटल्या आणि या मुलांच्या शाळेच्या बसगड्याही काही काळ कोंडीत अडकल्या होत्या. काही ठिकाणी मोर्चाच्या मार्गावर वाहतूक रोखून धरली नाही आणि या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळवली नाही. वाहतूक पोलिसांच्या या नियोजन अभावामुळेही काही ठिकाणी कोंडी झाल्याचे दिसून आले.