बारावी परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्य़ातून यंदाही मुलींनी बाजी मारली असून संपूर्ण जिल्ह्य़ाचा निकाल यंदा ८८.४६ टक्के इतका लागला आहे. यामध्ये मुलींची टक्केवारी ९२.२९ टक्के इतकी असून ८५.०५ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्य़ात कला शाखेच्या निकालाची टक्केवारी घटली आहे. जिल्ह्य़ातील शहरी भागात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी यंदाही आघाडी घेतली असून या परिसरातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९०.५४ टक्के इतकी आहे. मुरबाड, शहापूर या ग्रामीण पट्टयातील निकालाची टक्केवारीही यंदा वाढली आहे.

ठाणे जिल्ह्य़ातून ४६९१५ पैकी ३९९०२ मुले, तर ४१७९८ मुलींपैकी ३८५७६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता ८५.०५ टक्के मुले तर सर्वाधिक म्हणजेच ९२.२९ टक्के मुलींनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९४.१४ टक्के लागला असून वाणिज्य शाखा ८८.४६ तर त्या खालोखाल कला शाखेचा निकाल ७७.२५ इतका लागला आहे. यावरून यंदा कला शाखेची टक्केवारी घसरल्याचे दिसून येते. ठाणे महापालिका क्षेत्रातून एकूण १६१४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, भिवंडी या भागातील निकालाची टक्केवारी जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मुरबाडसारख्या ग्रामीण पट्टय़ाचा निकाल यंदा ९२.४७ एवढा लागला आहे. या वर्षी ठाणे जिल्ह्य़ातून वाणिज्य शाखेत ४५४०९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ४०१७० (८८.४६ टक्के)विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत २७९१८ विद्यार्थ्यांपैकी २६२८१ (९४.१४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर कला शाखेच्या निकालाची टक्केवारी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा घसरली असून १४४१५ विद्यार्थ्यांपैकी १११३६(७७.२५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण होऊ  शकले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिका क्षेत्र आणि तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक विद्यार्थी कल्याण-डोंबिवली परिसरातून परीक्षेस बसले होते. कल्याण-डोंबिवली विभागातून एकूण १९७४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १७२२६ (८७.४६) एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर यंदा उल्हासनगर महापालिका क्षेत्राचा निकालही ९०.०४ एवढा लागला आहे. तसेच शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण यांसारख्या ग्रामीण भागातही निकालाची टक्के ९० टक्क्यांच्या आसपास आहे.

कला शाखेच्या निकालाची घसरण

गेल्या काही वर्षांपासून कला शाखेच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. निकालाची टक्केवारी इतर शाखांच्या तुलेनत कला शाखेच्या निकालाची टक्केवारी कमी होताना दिसून येत आहे. यंदा संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातून १४४१५ विद्यार्थ्यांनी कला शाखेतून बारावी परीक्षा दिली. त्यापैकी केवळ १११३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इतर शाखांचा निकाल ९० टक्क्यांच्या आसपास असून कला शाखेचा निकाल केवळ ७७.२५ टक्के एवढा लागला आहे. कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यावर केवळ बीए हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे, असा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये रूढ आहे. त्यामुळे गुणांची स्पर्धा न करता कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा कल हा  केवळ उत्तीर्ण होण्याकडे असतो, अशी प्रतिक्रिया सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.डी. मराठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.