कल्याण : सामान्यांचे जीवनमान उंचावेल असे प्रयत्न सुरू असून देशात पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण येथे सांगितले.
‘हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट’ या शिवसेनाप्रमुखांच्या आवाहनानंतर अनेक वर्ष जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी मलंगगड आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्या निधनानंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे रविवारी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच मलंगगडावर आले आणि मिच्छद्रनाथांचे दर्शन घेऊन ते महाआरती सोहळय़ात सहभागी झाले. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांच्या विविध भागांतून शिवसैनिक गडावर सकाळीच दाखल झाले होते. आनंद दिघे यांनी सुरुवात केलेला हा उत्सव यापुढेही उत्साहाने साजरा केला जाईल. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच गडावर येण्याचे भाग्य लाभले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. सामान्यांना न्याय देणारे विकासाभिमुख सरकार राज्यात आहे. सहा महिन्यांत सामान्यांचे हिताचे निर्णय घेतले. महासाथीमुळे दोन वर्ष सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र आमचे सरकार आल्यावर प्रतिबंध लागलेले सर्व सण, उत्सव जोमाने साजरे करण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले. सामान्यांचे जीवनमान उंचावेल असे प्रयत्न सुरू आहेत. देशात पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातील सहकारी विकासात योगदान देण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले.
परिवहनची बससेवा
कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन विभागातर्फे कल्याण ते मलंगगड विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बस थांब्यावर पाण्याची, निवाऱ्याची सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे, असे परिवहन आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी सांगितले.