ठाणे : मोतीबिंदूसारख्या आजारामुळे होणाऱ्या अंधत्वाचे उच्चाटन करणे आणि नेत्रविकाराच्या लवकर निदानासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यात ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राबविले जात आहे.

ठाणे जिल्ह्यात देखील या अभियानास सुरुवात झाली असून २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यात या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ७ हजार १८२ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ही मोहीम ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे राबवली जात आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात व्यापक पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

मोतीबिंदू रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करणे, आवश्यक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया करणे, तपासणीपूर्वी आणि नंतरची औषधे पूर्णतः मोफत देणे, निवडक रुग्णालयांमध्ये रुग्णांना ने-आण करण्याची सुविधा देणे तसेच या अभियानाच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थी, आशा कार्यकर्त्या आणि ग्रामस्थांना सहभागी करुन घेणे असे ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या अभियानाचे वैशिष्ट्ये आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मार्फत देण्यात आली.

या अभियानासाठी पात्र लाभार्थी कोणते ?

  • ४० वर्षांवरील सर्व नागरिक
  • नेत्रविकारांनी ग्रस्त कोणत्याही वयोगटातील व्यक्ती (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार)
  • मोतीबिंदूचे पूर्व निदान झालेले रुग्ण
  • नेत्रविकारांची ही आहेत लक्षणे…

अस्पष्ट किंवा धुरकट दिसणे, रात्री पाहण्यास अडचण येणे, डोळ्यात दुहेरी प्रतिमा दिसणे वाचन करताना किंवा टीव्ही पाहताना त्रास होणे, वारंवार चष्मा बदलण्याची गरज वाटणे, रंग फिकट दिसणे अशी नेत्रविकारांची लक्षणे आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या ठिकाणी शिबिरांचे आयोजन…

ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच अधिसूचित खासगी रुग्णालयांमध्ये ही तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. आरोग्य सेवक, सेविका, आशा तसेच समुदाय आरोग्य अधिकारी हे घरोघरी भेटी देऊन संशयित रुग्णांची यादी तयार करण्याचे काम करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेत्रविकारांकडे दुर्लक्ष करू नका, वेळेत तपासणी करा आणि आशा कार्यकर्ती / एएनएम / आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे. – डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे.