ठाणे – राबोडी येथील मनसेचे कार्यकर्ता जमील शेख याच्या हत्याप्रकरणात अटक केलेल्या मारेकऱ्याने जाहीरपणे नाव घेतल्यानंतरही पोलीस कारवाई करीत नाहीत. एवढेच काय, कोर्टाच्या आदेशानंतरही पोलीस मुख्य सूत्रधाराला अटक करीत नाहीत. हा प्रकार म्हणजे पोलिसांकडूनच कायद्याची हत्या करण्यासारखे आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकरांशी बोलताना केला.
राबोडी येथील मनसेचे कार्यकर्ते जमील शेख यांची काही वर्षांपूर्वी हत्या झाली. त्यांच्या मुलीला दहावीच्या परिक्षेत ९० टक्के गुण मिळाल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड हे तिचे कौतूक करण्यासाठी जमीलच्या घरी गेले होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे आरोप केले. जमीलच्या दोन्ही मुली प्रचंड हुशार आहेत. पैशाअभावी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी मी आणि सुहास देसाई यांनी दहावी पास झालेल्या मुलीच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्याचे ठरविले आहे, असे आव्हाड म्हणाले.
जमील यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीवरच आम्हाला विश्वास नाही. एफआयआरमध्ये नाव असताना ते आरोपपत्रातून गायब केले जाते. असे नाव गायब करणे कायदाबाह्य असून यामुळेच पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे रहात आहे, असे ते म्हणाले. मारेकरी सुपारी देणाऱ्याचे नाव सांगत असतानाही पोलीस सूत्रधाराला अटक करीत नाहीत, हे चौकशी अधिकारी आणि गुन्हेगारांची हातमिळवणी झाल्याचेच द्योतक आहे. हे अधिकारी आणि आरोपी एकमेकांना भेटत होते, हे मोबाईल टाॅवर लोकेशन तपासल्यावर स्पष्ट होईल, असेही आव्हाड म्हणाले.