लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : परदेशी गुंतवणुकीत राज्याने कर्नाटक आणि गुजरात राज्याला मागे टाकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे. अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आजही महाराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत. गतवर्षी दाओसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार केले गेलेले असून त्यातील ८५ टक्के करारानुसार काम सुरू झाले आहे, असा दावा करत यंदाही राज्यात विक्रमी गुंतवणूक घेऊन येऊ असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री ठाण्यात व्यक्त केला. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे राज्याचा वेगवान विकास करणे शक्य होत आहे. सर्वाधिक विकासप्रकल्प हे महाराष्ट्रात सुरू असून आगामी वर्ष देखील महाराष्ट्राचेच असेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना ठाणे शहर शाखा आणि रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ठाणे शहरात रविवार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रक्तदान शिबिर आणि राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावून रक्तदान केले. यानंतर त्यांनी उपस्थितीतांशी संवाद साधला. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा उपक्रम गेली २९ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे आपण म्हणतो, रक्तदान शिबीरे आणि शिवसेनेचे अतूट असे नाते आहे. ज्यावेळी रक्ताचा तुटवडा जाणवला, त्यावेळी शिवसैनिक कायमच मदतीसाठी पुढे धावून आला आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक तरुणांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान केले याचे विशेष समाधान वाटते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आणखी वाचा-कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमधून वर्षभरात मोक्काचे १३० आरोपी अटकेत

मुंबईसह महाराष्ट्रात सध्या स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मुंबई स्वच्छ, हरित आणि सुंदर केली जात आहे. हीच संकल्पना संपुर्ण राज्यात राबविली जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्याचे महत्व आज लोकांना कळू लागले असून त्याचबरोबर त्याविषयी जनजागृती झाली आहे. त्यामुळे राज्यात सुरू केलेल अभियान मुख्यमंत्री किंवा सरकारचे नसून ती आता लोकचळवळ होत आहे. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छता होण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदा होणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गेल्या दीड वर्षात सरकारने प्रत्येक निर्णय सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. मी स्वतः देखील सीएम म्हणजे कॉमन मॅन बनून जमेल तेवढी लोकांची सेवा करतो आहे, असेही ते म्हणाले.

बाळासाहेबांसाठी मोठी श्रद्धांजली

येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर सकारले जात आहे. यामुळे दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्यासह करोडो रामभक्तांचे स्वप्न सकार होत आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. ही खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल, असेही मतही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा-डोंबिवलीत घरडा सर्कल येथे महावितरणच्या उच्च दाब वीज वाहिनीला वेलींचा विळखा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निव्वळ स्वच्छता मिशन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केले. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन अभियानाला सुरूवात केली. त्यावेळेस काही लोकांनी त्यांच्यावर टिका केली. हे केवळ फोटो काढण्यासाठी अभियान असल्याचे म्हटले होते. पण, आता ती लोकचळवळ झाली आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्रात सध्या स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्यावरून काही लोक माझ्यावर टिका करीत आहेत. पण, त्यांना सगळ्यांना सांगतो की, तुम्ही टिका करत रहा मी मात्र काम करीत राहील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच हे अभियान फोटोसेशन नाही तर, निव्वळ स्वच्छता मिशन आहे, असे प्रतिउत्तरही त्यांनी विरोधकांना यावेळी दिले.