पोलिसांकडून ‘एमएसआरडीसी’ला अहवाल

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : ठाण्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माजिवडा चौकामध्ये काही वर्षांपूर्वी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून शनिवारी रात्री एक कंटेनर थेट रस्त्यावर खाली पडला. या अपघातात सुदैवाने रस्त्यावर वाहन नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी यापूर्वी अशाच प्रकारचे तीन अपघात घडले आहेत. त्यामुळे हा उड्डाणपूल अपघाती ठरू लागला असून यासंबंधीचा अहवाल ठाणे वाहतूक पोलीस ‘एमएसआरडीसी’ला सादर करणार आहेत.

मुंबई, घोडबंदर, भिवंडी, नाशिक, पनवेल या भागांतील वाहतुकीसाठी ठाण्यातील माजिवडा चौक महत्त्वाचा मानला जातो. या चौकातून सतत अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या चौकामध्ये विविध भागांत जाणाऱ्या वाहतुकीसाठी उड्डाणपुलाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मार्गिका तयार करण्यात आली नव्हती. त्यानंतर काही वर्षांनी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपुलाची मार्गिका तयार करण्यात आली. बाळकुम आणि घोडबंदर येथून ही मार्गिका सुरू होते आणि माजिवडा येथून वर्तुळाकार पद्धतीने ही मार्गिका पुढे जाते. या मार्गिकेखालीच मुंबई-नाशिक महामार्ग असून त्यावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या उड्डाणपुलाच्या वळणावरून एखादे वाहन खाली कोसळले तर थेट मुंबई-नाशिक रस्त्यावर पडेल आणि त्यामुळे अपघात होईल, अशी भीती सुरुवातीपासूनच व्यक्त होत होती. असे असतानाच या मार्गावर गेल्या चार वर्षांत तीन अपघात झाले आहेत.

यातील पहिला अपघात २०१७ मध्ये झाला. यात एक कंटेनर चालक शेकडो टन वजनाच्या तारा घेऊन जात होता. या तारांचा रोल उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर खाली पडला. मध्यरात्री झालेल्या अपघाताच्या वेळेस रस्त्यावरून वाहन जात नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली होती.

दुसऱ्या घटनेत दुचाकीवरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी या मार्गावरून कंटनेर खाली पडला असून त्यात चालकाचा मृत्यू झाला. या सर्व अपघातांचा अहवाल ठाणे वाहतूक पोलीस लवकरच एमएसआरडीसीला सादर

करणार आहेत. तसेच या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यास सुचविणार आहेत. यामध्ये रस्त्यावर पांढऱ्या पट्टय़ा, वाहनांची वेगमर्यादा कमी करण्याच्या सूचनांचा समावेश असणार आहे.

दरम्यान, वाहने भरधाव वेगाने जात असल्याने असे अपघात होतात, असा दावा ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्याने केला. तसेच या ठिकाणी लवकरच लुकलुकणारे दिवे बसवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.